दाउनीया दर धरसी पदर, कां अधरचुंबनातें ? मजसी तुला काय नातें? ॥धृ०॥

कुलांगना मी, परवनीता आतळसी करानें । बळत्कारें बहु निकरानें । मृन्मय घटवत्‌ स्त्रीवपु हें स्पर्श विटाळानें । पुरलें तेची क्षणीं जीणें । पथींच धरिशी केवळ हा अविचार । वय सान, तुला कां कामाचा संचार ? । हें कर्म नव्हे कीं बरें. करी सुविचार । विजन नव्हे कीं पाहातें जन, कशी जाऊं सदनातें ? । केवी जनां दाऊं वदनातें ? ॥१॥

कृष्ण म्हणे तूं ‘परवनीता’ तरी ‘परपुरुषा’ पाहीं । मज तुज होत नसे कांहीं । मुळचें नातें तुझें आमुचें सर्व देती ग्वाही । अष्टदश चारी साही । पाहातें जन म्हणसी तरी तो मी । धरा आप वायु तेजो व्योमीं । हे प्रभा रवी-मंडळा किंवा सोमी । स्वयं प्रकाश चाळक मीचि स्थिरचर जनातें । मजला सर्व असे नातें ॥२॥

कामिनी म्हणे तूं गोष्टी अचाटा सांगसी मज कान्हा । तूं नंद वसुमतीचा तान्हा । सान मुलांचे संगे चोरुनि नवनीतपयपाना । गोकुळीं छंद करिसी नाना । पौगंडदशा तुझी कीं रे जलद शामा । तूं जाई, खेळ ईटुदांडू हमामा । या न करीं चेष्टा आम्हां, न येती कामा । आत्मारामें चिदगोपाळें हरिलें कुमनातें । चिन्मय दिधलें सुमनातें ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel