मी किती करूं मनधरणी माझे धणी ? ।
चालवा लळा, दिली या शरीराची हमी ॥धृ०॥
चंदन बटाऊ पहाया जी । उभी राहते ।
लागलां विछेत प्राण प्रियकराच्या हातें ।
अशी लावुन माया जी । सोधुनी पहाते ।
नटदार छबेला पाहुन तरमळते ।
कांही तरी येऊं द्यां माया जी । हजर होते ।
शेजारीं निजा मज कवळुनी एकांतें ।
तुम्ही दगलबाज बेईमान जी । अंत:करणीं ।
वाहिला प्राण म्हणे रत्नाची खाणी ॥१॥
पोषाख करा हिरवा हो आवड माझी ।
पेहरवा मी करिते गुलाब प्याजी ।
अपहस्तें खोवीन मरवा जी । आवड माझी ।
मज घ्या मांडीवर, करा हो इष्कबाजी ।
गुलबदन ज्योत आरवा जी । शरीर पाहा जी ।
आतां गेंद हाताळा चित्तापुन मी राजी ।
घातला इष्क फासा जी । मी हरणी ॥२॥
खुरबान करिन हा प्राण सख्यापाशीं ।
कधीं येतिल माझे गुणराशी ? ।
म्हणे होनाजी बाळा विलासी ।
आले साजण तुझिया मंदिरासी ।
आतां भोगित जा सुखें तयासी ।
काशिराम म्हणे करित जा सेवा ।
नयनीं दावा । कधीं पाहिन मी प्राणविसावा ? ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel