लावून माया गेला राया । नूतन माझी कोमळ काया ॥धृ०॥

कर्मकथा ही सांगूं काई । या शरीराची होते लाही । राव राजेन्द्र माझे शिपाई । टाकून गेले, करू गत काई ? । भागवून फसविली गाई । किति आवरूं ? आज जातें पराई । जा ग सख्यांनो, आणा तयाला । दृष्टि पाहीन मी लागेन पाया ॥१॥

मी दिनवाणी, काय करावें ? । जाउनिया कवणासी धरावें ? । हें दुख आपलें किती अवरावें ? । धिक्‌ धिक्‌ माझें जिणें मरावें । धनद्रव्याला काय करावें ? । वाटे जीव पतिराज असावे । मी थोराची कोमळ जाया । गर्वहरण होइल पतिराया ॥२॥

त्याच्या चरणीं लोभ हा माझा । सोडूनिया कसा गेला राजा ? । पत्र पाठवा जलदी या जा । आम्हां सांगा कानिं आवाजा । जासूद जोडी जलदी जा जा । घेऊन या किती पहातां मौजा ? । फुरफुरल्या आज दोन्ही बाह्या । तनमनधन हें त्याच्या ठाया ॥३॥

ऐकुन ग्लानी प्राणसखीची । खुणमुद्रा ठसली नारीची । स्वारी परतली पहा रायाची । चमकत पुतळी रंग बहारीची । काय तारिफ सांगूं स्वरुपाची ? । भोग आतां, झाली अग्न देहाची । फडप्रसंगी उभा गुणिराया । रामा म्हणे, कर अर्पण काया ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel