दिला दिला जिव दिला तुम्हांला, नका मला विसरूं ।
कठिण कदर ही नदर, पदर किती एकंदर पसरूं ? ॥धृ.॥
धरा उराशीं जरा सुंदरा, कर्दळीच्या कोंबा ।
चक विषय जाचला, मला तुम्ही बेलाशक झोंबा ।
नव्या नव्या वैभवा वाढवा अंतरींच्या लोभा ।
गुणप्रविण हिण अहिण (?) तुम्हांविण काय माझी शोभा ? ।
अधिक अधिक अति अधिक सुगंधिक जणुं चंदनगाभा ।
गबर जबर दिसे अमर उमर भरनवतीच्या खांबा ।
कां धरितां दूर मुखासी ?
निष्ठुर वृत्ति मजवरसी
निजते अंगासरशीं
हें विषयदु:ख मी श्रमलें या संसारी-साहतां ।
दुष्काळ भेटीचा कुढें बाहेर परभारी-राहतां ? ।
आनंदभरित रूप तुमचें लोचनद्वारीं-पाहतां ।
स्वत: लागता पता (?) उभयतां मग मागें न सरूं ॥१॥
सुगर आगर गुणनागर सख्या तूं सुखसागर बरवा ।
आंसंनीं, शयनीं, भोजनीं, जनीं, मनीं आस माझी पुरवा ।
दिशिंनिशिं कशी दुरशी, अशी काय अन्याई ठरवा ।
उदित विदित भरबिदित सदोदित नित मागें फिरवा ।
असे नसे, कसें बरें दिसे ? तुप साखरेला जिरवा ।
हसुन, बसुन, घ्या कसुन, रुसुन, मग मजपासुन दुर व्हा ।
दिस बहाराचे जाती
रसरस करिते छाती
तळतळ तळते रातीं
लागलें ध्यान, अवधान सुचेना कांहीं-त्रासले ।
हें कायापुर चैतन्य शरीर तव पाईं-घासले ।
सापडलें अयाचित रत्न हातीं लवलाही-असलें ।
ठसले, वसले, गवसले, विमानीं बसले, कशि घसरूं ? ॥२॥
फण फण फण फण फणी मदनविंचू मारी फणका ।
सण सण सण सण सणाट निघती विषयाच्या शिणका ।
टण टण टण टणा लागला सर्वांगीं ठणका ।
दण दण दण दण दणाणी जीव करितो दणका ।
खण खण खण खणीत देतसा जरबेचा खणका ।
घण घण घण घणोर लक्ष्मी, मग घ्यावें ऋण कां ? ।
मद्‌ह्रदयांतरिं साक्षा
कर धरिला ज्यापेक्षा
शिकले तुमची शिक्षा
कल्याणसमुद्रा ! शुरसत्वामध्यें आगळा-भासशी ।
सर्वत्र प्रकाशित चंद्र उगवला सगळा-दिसशी ।
भोगुन भोग अली त्या कर्मा वेगळा-दिसशी ।
हशी खुशी पशी (?) मजविशी हा मायापूर नका विसरूं ॥३॥
हालखि तलखि इतकी, मस्तकीं कामानळ चढला ।
न ढळे न वळे, ना कळे, आळेंबळें मदकुंजर अडला ।
घरिंदारिं, कांतारीं पक्ष धरितां दुसरीकडला ।
अंगरंग नि:संग संग मज तुमचा आवडला ।
रहा, च्याहा, सुख साहा, पहा हा स्नेहसंग्रह घडला ।
निजा, पुजा, मज भजा, माला ताजा पदरीं पडला ।
आटआटवुन खिर अळली
एक वर्ष मनें मिळलीं
संकटवेळा टळली
भावार्थप्रवाहीं ही मुक्ती झाली मजला-दर्शनें
नाही केली अवज्ञा, देहे काष्ठापरि झिजला-घर्षणें ।
होनाजी बाळा म्हणे, प्राण तुझ्या गडे रिझला-भाषणें ।
जिणें उणें साधणें बोधणें येक्या पणें आचरूं ।
वारंवार विचारसार हा स्वजनामधें विचरूं ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel