शोक करित्यें कोमळ भाजा । दृष्टी पडो गुणि राघव माझा ॥धृ०॥

वय माझें द्वादश वरुषांत । रति गजबजली हो जाई भरांत । उभी होत्यें आंत माजघरांत । सय जाली कीं हो, आल्यें दारांत । या वेळीं असता गे मंदिरांत । भोगित्यें आवडी हो सुख शरीरांत । चळ भरला, मुकलें कीं पति-तेजा ॥१॥

तीन बंगले माझ्या ग पतीने । बांधुनी ठेविले हो हर युक्तीने । तीन ठाई तीन खासे बिच्छोने । लोड तिवाशा हो बुंद जमखाने । पडदे जरीबाब सलोने । आंत बसले कीं हो बहुत मजेनें । हुंदका (आला) कोणासंगें करूं मौजा ? ॥२॥

दु:ख आपुलें तरी सांगुं कुणासी ? । किती आवरूं गे आतां या मनासी ? । अंतरले कसे राव आम्हांसी ? । कां चुकविलें हो मज गरिबाशी ? । शोध करा, भेटवा गे हंसासी । मी रत जाहालें हों या स्वरुपाशीं । श्रम हरति पाहतां गे क्षणिं राजा ॥३॥

पावन जाले देव मल्लारी । अवचित आले हो साजण दारीं । लगबग धाउनि गेली नारी । भेटे कडाडुनि कवळुनि धरी । नींबलोण मुखाउनि उतरी । आतां नका जाऊं हो मुलुकागिरी । बाळ राघो म्हणे, सेजेवरी रम जा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel