रुसला साजण तो मजला दावा । मज मैनेचा रावा ॥धृ०॥

आवड मज रायाची काय सांगावी । काय वर्णूं चतुराई ? । सख्याला शोभे हिंदुपदपातशाही । चौमुलखांत आवाई । भडक मंदिल पगडी शिंदेशाई । भेट सख्याची घ्यावी । तुरा मोत्यांचा शोभे शिरीं बरवा ॥१॥

गळ्यामधिं मोत्यांचे पेंड साजे । मज लालडीचे राजे । स्वारी शिकार खेळे धनी माझे । शत्रु पाहुनया लाजे । फत्ते तलवार रणीं रणशुर गाजे । गहेरी डंके बाजे । दर्शन होतां पंची भोगावा ॥२॥

हाशीखुषीनं सजणा घ्या जवळी । भोगा काया कवळी । करिन शृंगार सुबक वस्त्र पिवळी । बोले राजस बाळी । उजव्या मांडीवर घ्यावें जवळी । शांत होईन त्या काळीं । कवळुनी धरा सख्या आज रंग बरवा ॥३॥

हौस मनाची पुरवी पंढरीराया । पाव मला तूं सखया । राव राजेंद्र जवळ आले गुण पाह्या । करा कृपेची छाया । सुंदरा पलंग सवारी या सखया । येऊं द्या माझी दया । रामा छंद करूनी गाई नवा । मजवर मेहर ठिवा । रुसला साजण तो मज दावा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel