कधिं ग साळू बोलसी आवडसी आम्हांला ।
प्राणदान देउं तुला, हाच लाभ झाला ॥धृ०॥
स्वरूप तुझे पाहोनी चंचळ मन झालें ।
रात्रंदिस येवोनी फिरते भवताले ॥
छातीवर कुच दोन्हीं पहातांना मन धालें ।
घडींत रंग करू दे संग, भुललों नखर्‍याला ॥१॥
केव्हां स्नेह घडेल आतां सांपडशी आम्हांसी ।
होइल कीं तुमची सत्ता प्रीतीच्या सुखासी ।
फार दिवस बोलतां लाजतों मनासी ।
मुखचंद्र दावी तुझा, रिझलों स्वरुपाला ॥२॥
दगलबाज स्त्रिया तुम्ही, कळूं नये कळली गे ।
वाट तुझी धरली आम्ही, घडी आज टळली गे ।
वचनाची दे ग हमी, तूं नट कळली गे ।
आशावंत पुरवी आशा, एक मास झाला ॥३॥
रत्न गुणी माणसा तूं ये आज रंगमहालीं ।
भोग मला, लइ दिवसांनी भरपाई झाली ।
मी पुतळी लाव कसा, आज पडले ख्यालीं ।
रामा म्हणे भोग आतां, आज मिलाफ झाला ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel