घडि घडि नको बोलूं जनीं, वर्म हें कळेल सख्या रे सजणा ॥धृ०॥
सारखें वय तुझें न माझें म्हणून लोकीं कीं भास पडला ।
जल्पती दुष्ट नित मनीं जेव्हांपासुन संग्रह घडला ।
यामुळें जिवलगा जसा दुधामधिं लवणखडा पडला ।
उभयतां तसें घडलें कीं । तुजपदीं चित्त भुललें कीं ।
पदरीं तुमच्या पडले कीं । मन तुम्हांकडे वोढलें कीं ।
दुष्ट निंदिता बघुन आपणा ॥१॥
चार दी स्वस्थ रहा घरीं सगुणनिधी तूं गुणपात्रा ।
बोलतां आपण उभयतां तर्क बांधुन ठिवती अंतरा ।
कल्पना आणुन मनीं तुज विनविते कोमलगात्रा ।
घनबिंदु सुप्त आकाशीं । चातकी इच्छी तयासी ।
त्यापरी लक्ष तुजपाशीं । सख्या रे मम नेत्रींच्या अंजना ॥२॥
पूर्वीच्या संमंधावरून अर्पिले तनु तुजला आपले ।
लागला जिव्हारीं वार, दुष्ट तुजविशीं फार जपले ।
तुजसाठीं किती राजसा मी पूर्वीं तप तपलें ।
या शहर पुण्याची वस्ती । तिनदां नको घालुं गस्ती ।
बरे वाटे गरिब दिसती ।
मनीं कर पुरती चवकशी प्राणरंजना ॥३॥
कळूं नये स्नेहाचें वर्म करून बदकर्म जनालागी ।
पडूं नये कोणाचे भरीं शोध तूं करी ह्रदयाजागीं ।
साजणा, असावें गुप्त येकांतीं आपण विषयालागीं ।
गुणगुजगोष्टी प्राणविसाव्या । सांगितल्या जीवीं धराव्या ।
होनाजी बाळा गुणि राव्या ।
बाळा नारायण म्हणे, तुझे गडे बहुत रसिक रसना ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel