हाळदिचा डाग लावून गेले परदेशा ।
द्बादश वर्षे कंठलीं, नाहीं संदेश ॥धृo॥
घरी उदंड धनसंपत्ती विषवत्‍ दिसती ।
पाहवेना मला तिजकडे, उदासीन चित्तीं ।
भाऊबहिणी सुखाचे संगती, दु:ख मजवरतीं ।
हे जगन्निवासा, कैशी दैवाची प्राप्ती ? ।
माईबाप कोड बहु करती, परि वरकांती ।
आंतरच्या दरदाला गे न चले युक्ती अंगी भरनवतीचा पुरू ।
नाहीं द्रव्य पेटीमधीं भरूं ।
जीवनाविण सुकला तरू ।
रजु-दर्शन सखु मज होतों पंधरा दिवसा ॥१॥
म्या बलाऊन सासुला विचार केला ।
पाठवा पत्र लेहून स्वामीरायाला ।
हौसेनं बाग लविला, ऐन रसा आला ।
इष्काचे भ्रमर घालुन जातिल घाला ।
आग लागो ह्या जोडिल्या मुलुखगिरीला ।
टाकिले मला निर्वाणीं, निष्ठुर झाला ।
उडते झालें पाखरूं ।
कुठवर मी आवरून धरूं ? ।
रतिभोग पिंजरा करूं ।
आळस ( आलच ? ) होइल, मग यत्न करावा कैसा ? ॥२॥
जासुद गेले लष्करा शोधुन डेरा ।
लाखोटा देऊन सांगितला वृत्तांत सारा ।
वळखुन घरचें अक्षरा हर्ष आंतरा ।
दिली शालजोडी जासुदालागीं मंदिल गहेरा ।
लेहुन आलें उत्तर, वाचे सुंदरा ।
नारी चवमासा छावणी पंढरपुरा ।
आम्ही रजा घेतली आतां ।
काय करूं येऊनी रिता ? ।
आहे तैनातीचा गुंता ।
मनसुब्यानी सरकारी, फशिवला पैसा ॥३॥
दैवाची दशा उजळती बहु सुरती ।
क्षणक्षण वाम नेत्राचीं लवती पातीं ।
पतिराज गृहासी येती, विप्र शुभ वदती ।
वाटली दक्षणा अमुप, नाहीं गणती ।
उभि राहुन गच्चीवरतीं स्वरी न्याहाळती ।
चकचकाट चहुकुन थवे गलुगे ( ? ) तुटती ।
गोविंदराव म्हणे सुंदरी ।
घे भोगुनया धनवरी ।
घटकेची रात्र आजी खरी ।
वाहेल ज्वानिचा लोट थोडक्या दिवसा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel