ओतिव स्वरूप तेजस्वी चंद्रमा जसा ।
कोण देश ? कुठिल रहिवासी ? सख्यांनो पुसा ॥धृo॥
भासतो कुणी सरदार डौल अंबेरी ।
मंदील शाल शिरपेच तयाचे शिरीं ।
शोभली गळा मोत्यांची माळ दुहेरी ।
फाकलें तेज, चमक ती नक्षत्रापरी ।
अबलख घोडयावर कलगी साजरी ।
कंडे पट्टे जिन कलाबतू झालरी ।
ईश्वरें यासी चांगुलपण दिधलें कुठुन ? ।
निर्मळ तनु सोन्याची घडली अटुन ।
हें राजहौंस पाखरू अलें येथें कुठुन ? ।
पाहुन शीतळ छाया । उतरला सगुणराशी ।
उदकें गुळणा करुनिया । बैसला हो सुखवासी ।
पाहे पनघट न्यहाळुनिया । मोहना मुखरण खाशी ।
( चाल ) प्रत्यक्ष मदनपुतळी सख्यासी खुण सांगे ।
मी धुते इथे चोळीस, तवर तुम्हि जा गे ।
डाळिंबी कळी कवळी राहिली एकली मागें ।
संशयांत चित्त, प्रयत्न करवा कसा ? ॥१॥
धीट मन करुन एकनिष्ठ उभी राहिली ।
तनु कर्पुर करदळीचें तेज पहाळी ।
उजळली दिशा, महिताप प्रभा फाकली ।
गुणवती चतुर जाणुनिया बोलविली ।
बावरी तर्‍हा छबदार अचुक पाहिली
अहो, या हो या, गौरव शब्दें मोहिली ।
सौभाग्यवती तूं लावण्याची सुंदरी ।
का आलिस येथें ? काय विचार अंतरीं? ।
उभयांचें विघ्न, नको पडुं विषयाचे भरीं ।
सांगा मजसी गुणवंता । किमर्थ उदासी धरली ? ।
त्यागिली घरीं कांता । ती तुम्हांस अंतरली ।
एकले मुलखीं फिरतां । दिसे चित्तवृत्ति बावरली ।
( चाल ) असो घरासी चलावें, जिवलगा आजची रात ।
वचनासी मानावें, धरुं नये संशय चित्तांत ।
मी दासी जाणावें, करुं विलास रंगमहालांत ।
पदिं प्राण करिन खुर्बाण, निश्चय ऐसा ॥२॥
बोलणें रसिक ऐकुन कळवळला गुणी ।
झाले विषयांध उभयतां निर्भय मनीं |
रस्त्यांत झुकत चालली लगबग मोहनी ।
वाडयांत नेला, उतरविला खुण दाउनी ।
‘ पाहुणा आला, ’ सासुशीं सांगे जाउगी ।
‘ बहिणीचा मुल तुमचा ’ केली संपादणी ।
अंदर बोलाउन भेटविला नेउनी ।
भोजन करविलें स्वहस्तें वाढुनी ।
टाकी बिछोने दासीला सांगुनी ।
शृंगार करी मोहनी । कळि खुलली गुलाबाची ।
तन बागांतिल खिरणी । मूर्तिमंत कनकाची ।
कोमळ नवी तरणी । साडी नेसुन भरजरीची ।
( चाल ) अनुसरली सख्यासी, आलिंगी प्रीतीगें ।
निजली सुखसेजेसी, करि विलास गमतीनें ।
कर्मिली रात्र ऐसी, गुंग झाली जाग्रतीनें ।
सारखे उभयतां, एक रुपाचा ठसा ॥३॥
उठली अबळा, करविली कुचाची त्वरा ।
सांगितलें, पळभर बागामधिं उतरा ।
हाणार गती, तिचा भ्रतार आला घरा ।
त्यासी कळलें सकळ, घेइना विसावा जरा ।
कंबरबस्त तैसाच तेथुन चालला ।
निद्रिस्त मुशाफर बागामधिं पाहिला ।
उपसुन खांडा हात मानेवर मारला ।
झुरक्यांत उभी सुंदर । न्याहाली चरित्र ऐसें ।
भिजला घर्मे पितांबर । निस्तेज बदन दिसें ।
मस्तकीहुन छेलित पदर । देहीं भान कांहीं नसे ।
( चाल ) सद्रदित सगुण दोहिता ( ? ) क्षोभलास परमेष्ठी ।
आग लागो संचिताला, दु:ख लिहिलें लल्लाटीं ।
भागली शोक करितां क्षणक्षणा होती कष्टी ।
गेलास जिवें मजकरितां रे राजसा ॥४॥
केला धडा मनाचा, निघाली जलदी करून ।
आठऊन सखा उर येतो भरभरून ।
शिर धड जुदे,असें पाहिलें तिनें दुरून ।
दिली मांडी उशा, घातला हो शेला वरून ।
कुरवाळी मुख, कवटाळी हृदयावरून ।
कुरवंडी करीन शरिराची आतां तुजवरून ।
घाबरी राजबाळा, भिरभिरा पाहें भवतीं ।
दाटला दुःख उबाळा । घेतला खंजिर हाती ।
भेदलें हृदयकमळा । मान वाकली मानेवरतीं
गोविंदराव म्हणे इष्काचा फिरका असा ।
अविचार स्रियाची जात मनाला पुसा ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel