रूप जैसा ऐना, चकचकाट पाहुन तुजवर दिल फिरला ।
ये शेजारीं बैस, अमळशी काढ पदर मुखडयावरला ॥धृ०॥
ठाणमाण कल्याण वासना गुणसुंदर बहुतापरिची ।
नाहीं कुणाची दर्द जरा, तूं पाच्छाइण अपल्या घरची ।
चिरकंचुकि भूषण नागमंडित सरळ वेणि पाठीवरची ।
लहान चिरी कुंकाचि कपाळीं, लाल जशी पिकली मिरची ।
नव्हे पदर वर घडी सारखी, आंतबाहेर येकअंतरची ।
उदंड काष्ठे काय साम्यता लागे मैलागिरिची ? ।
कधिं लागशिल हतीं ? घराचा तुझ्या अम्ही थारा धरिला ॥१॥
नदर वयांत भ्ररली भरनौती, गोड जशी साखरपेढा ।
डळमळती ह्रदयावर जोबन, दोन आंबे आले पाडा ।
तेजस्वी टकटकित गुलाबी पुष्प जसे येते झाडा ।
निकोप काया कोमळ, केवळ किरळ कर्दळीचा माडा ।
लावुनिया प्रीतिच्या जरबा पुरुषा करिसी वेडा ।
तुला भेटल्याविणें जाइना येक दिवस आमचा खाडा ।
दे प्रसाद उजवा कार्यार्थी, निरउपाय अमुचा हरला ॥२॥
वदन कमळ, देह निर्मळ, नेहमीं अचळ पदर शोभे माथा ।
टपुन उभे भिरभिरा पहातों रोज तुला जातां येतां ।
जिगजिग झालें फार, तरी न लागसी त्याचे हाता ॥
तू चतुराईची हद्द, सखे तूं शहाण्याला देसी गोता ।
शिरोभाग बत्तीस गुण औधे नारीनर दृष्टी पहातां ।
पण हरलें कितिकांचें पाणी तुझ्या घरीं वहातां वहातां ।
कसें करून भोगावि, मनाचा हा विचार पुरता ठरला ॥३॥
उदंड जाहल्या, तरी वेगळ्या त्या चांगुलपणाची युक्ती ।
मिठसाखर पांढरी, परंतु अपअपल्या मोलें विकती ।
एकावर चढ एक लाख पाहिल्या, तुजवरती आमची भक्ति ।
मालावरते मोल हव्या त्या घे, मोहरा देतों नक्ती ।
प्रीतिचें साधन हेंच कीं, अडल्याला द्यावी मुक्ती ।
हेत पुरवितें एकदां एकांतीं, गांठ पडल कोण्या युक्ती ? ।
आज आज उद्यां उद्यां किती म्हणसी तूं ? दिस आयुष्याचा सरला ।
होनाजी बाळा म्हणे, तुसाठीं जिव बारा वर्षे झुरला ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel