माशुक उभी रंगमहालीं, कधीं उतरेल खालीं ? ।
कवळी कळी डाळिंबाची टवटवीत लाली ॥धृ०॥
गोरा रंग तुझा पाहुनिया आम्ही आलों धाऊनिया ।
चौगर्दा लाल पसरले मधिं बोले मुनया (?) ।
मी इष्कबाज रोखुन वाटा पाहावयास मुखवटा ।
कैका ये प्राणअवस्था, किती द्वार धरूनिया ।
पावेल इष्कपेचाचा मार पेच त्याचा ।
तसा डोल तुझ्या शरीराचा नाजुक बनुनिया ।
उजव्या गालावर तीळसा चमकतो ग नीळसा ।
दोन्ही नैन विखारी कहरी रोखित निघाली ॥१॥
रत्नखचित कंकण करिंचे, खोदिव जडिताचे ।
उंच बर्‍हाणपुरचा शालु बुटवेल तर्‍हेचे ।
वाणी उदमी राजीन्द्राचे, देहभान तयाचें ।
त्या प्राणवल्लभेसाठीं उभे हाटून केव्हांचे ।
गेले होष उडून कितीकांचे, बोलेनात वाचे ।
लोथीवर लोथी दुरुस्ता घेरले केव्हांचे ।
सरदार चार ते गुंगले, घोडयावर गुंगले ।
जिकडे नेत्राचा गरका, तिकडेच धुम केली ॥२॥
केली गरदी रविवारांत, आली बुधवारांत ।
गहातांच विचारीं पडले, खोचले मनांत ।
दुलदुला शिपाई सैन्यांत, गेला भिडुन रणांत ।
तशी चपला चमकुन माणिक चौकांत ।
उज्जनीचे मुशाफर तेथें उभे भर रस्त्यांत ।
एकावर एक रिचवले अशी पाहात मूर्त ।
धीर धरून सावरूं उठले, माघारीं उलटले ।
नार जखमी करून आम्हांला कुणीकडे गेली ? ॥३॥
जा जेजुरीचे बनसी छबदार लिभासी ।
रथांतुन मुशाफर बुंदखडा गेली घेउन घरासी ।
श्रृंगारून मंदिर खासी सुंदर विश्वासी ।
सुस्वभाव दावुन आपुला भोगिले तयासी ।
नवें कवन आणुन रसासी, जडणी बुंद खासी ।
दयापूर्ण नाथ प्रसन्न बाळा राघुसी ।
गुणी सगनभाऊचे चुटके पाहा, अचुक फटके ।
गातात रसिक रसेले गर्द सभा झाली ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel