ठकु, दर्शन दे, पाहुं दे तुझा मुखडा ।
अंगणीं मुशाफर फंदी फाकडा ॥धृ०॥
गोरीपान ज्वान राधा । वय लहान, नूतन आलें न्हाण, सुबक बांधा ।
शिणगार करून साधा । तन्मणी, ठुशाबाळ्या, बुगडया सुद्धां ।
इष्काचा कैफ सदा । तुझी प्रीत करून मनमानेसा सवदा ।
करिं बांगडया पाटल्या काशीकडल्या ।
लाल पिवळ्या शुभ्र हिरकण्या जडल्या ।
आम्ही गिर्‍हाइक पहाया मुरकुंडा पडल्या ।
खर्च करूं म्हणतों पैसा रोकडा ॥१॥
चतुरे राजसवाणे । रंगली बत्तीशी, दंत अनार दाणे ।
नासाग्रीं नथणीनें । मोठा जुलूम केला, सुरती मोती दाणे ।
उरीं उसासले चिमणे । शुभ्र कांचोळीं, गरतीचें लेणें ।
कंबर बारिक, पोटर्‍या नाजुक, गोर्‍या ।
पदीं साखळ्या करंगळ्या नेर्‍या ।
दिव्य मुखरणी येईनात आतां कोणी सामोर्‍या ।
बोलणें रसिक, गोड बर्फीचा तुकडा ॥२॥
प्रीतीचा पाढा वाच । दुर्बळपण जाइल संसाराची आच ।
धर शब्द जिव्हारीं साच । केल्यानें होईल, नित मोहरा दे पांच ।
जुमडयाला मरवापाच । गोर्‍या रंगावर हिरवी पैठणी काच ।
मैत्र नगरी नांदती गजभारानें । डुब करून घे वस्ता ने आळंकारानें ।
वाजऊं डऊर बहारानें । श्रीमंत वसंत चंद्रबुंदखडा ॥३॥
बोले शब्द येउन स्त्रिय । ‘द्वारांत उभे कां ? माडीवर या ।
गुणग्राहिक गुणवर्या । वसवसा इष्क हा सांगितला पर्या ।
मी आज्ञांकित भार्या । उभयता प्रीत हो कर राया ।
सुख तुम्हांला, सुख हो मजला नित्य असो ।
चित्तवृत्तीही संपत्ती गुणीवंताच्या नित असो ।’
कृष्णकृपेनें अधिक अधिक ममता असो ।
म्हणे सगनभाऊ, घ्या दिपवाळीचा विडा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel