दुर्बिण घेऊन हातीं चंद्र न्याहाळी तुझा बरवा ।
माझ्या मनची आवड सख्या, पोशाक करा हिरवा ॥धृ०॥
चवथा दिवस अहो सिरताज जाते न्याहा ।
चाक पाक येते बनुन, नका पाठवूं बोलवाया ।
केस वाळवीत उभी, न कळत याल चोरुनीया ।
आणि आपल्या नादांत हळूच कुच धराल धावुनीया ।
एक नोक नेत्राची दावीन ऐसी गुणीराया ।
इष्कउबाळा होतो, आज बागांत चला राया ।
नाभीकमळापासून मंचकीं बसून मन स्थिरवा ॥१॥
स्नान करून मी आले, उभी मी जोडून दोन्ही कर ।
मी आपल्या सेवेस असावी दृष्टीसमोर ।
चवथ्या मजल्यावरी हवाशिर जागा सुंदर ।
आपण मला सांगा अलंकार करिन शृंगार ।
हिरवा दुपेटा, हिरवी पगडी कंगणीदार ।
मुक्ततुरा शिरपेच चवकडा, मोती दाणेदार ।
आणीक एक सांगते, शिरीं खोवीन दवणा मरवा ॥२॥
पुण्यवान तुम्ही पुरुष, बसा चोपाळ्यावर विलासी ।
आपुन मला सांगल, थाट करिन रंभा जैसी ।
कमी काय केलें स्वामीनें, वस्त्र हरजिनसी ।
शृंगारामधिं डुब चमकली जडावाची अरसी ।
चुकल्या जागीं करा संज्ञा करिते पेरवा ॥३॥
नित उठुन चोचल्या छबेल्या परस्त्रीकडे जातां ।
लुंडमुंड मुरकुंड स्त्रियांच्या चित्राकडे पहातां ।
धरी आवळूनया मला छबेल्या मुखचुंबन घेतां ।
मी फिरते भवतालीं, उशीर कां? बसा पलंगावरता ।
मी कमान मुलतानी, तुम्ही तीर, जोडा संपूर्णता ।
लक्ष लावूनी बसा, सख्या, मी आहे तुमची कांता ।
सगनभाऊचें कवन ऐकतां खुशी जाहले आरवा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel