सख्या, तुझ्या प्रीतीची गोडी लागली । चालवी प्रीत चांगली ॥धृ०॥
लहानखुरी अटकर बांधा नाजुक । मुखचंद्र अमोलिक ।
आवड तुम्हांला, जवळ बसा सन्मुख । आज पहा माझें कौतुक ।
इष्क बिंबला, घालि मुखामधिं मुख । मग जिवा वाटलें सुख ।
जाऊं नको सजणा, मी पलंगीं येकली । आज कां माया टाकली ? ॥१॥
तुम्ही नटनागर, मी मैना चांगट । कां करतां मजवर हाट ? ।
शहर पुण्याचे गुंड लई चेंगट । कर लवकर मजवर सुट ।
घटकेंतुन घरीं येतां लई झटपट । नवतीची मांडली लुट ।
कवळुनी धरितां कंचुकी दाटला । लुगडयाची निरी फिटली ॥२॥
सुख ठकडे, ठकपणा किती दाविसी ? । माया ममता लाविसी ।
विष्कबाज तूं, कधीं आम्हां भेटसी ? । नूतन नवती पंचिसी ।
तूं कमळण, आम्ही भ्रमर लुब्धलों तुशी । रंग पाहुन झालों खुषी ।
द्यावी उजवी गुढी, आशा लागली । ज्योतिस ज्योत रेखली ॥३॥
एकांतीचें गुज तुम्हां सांगते । मर्जी पाहून वागते ।
वेड लागलें मला, वचन मागतें । सारी रात्र किं हो जागते ।
रावबनसीच्या गळ्या मिठया मारते । मग आनंदांत भोगते ।
सगनभाऊ म्हणे विष्कबाज भेटली । रामाची भ्रांत फिटली ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel