चैत्रपालवी झाडागणिक फुटते हिरवी पिवळी ।
नार नव्या नवतीची नवळी ॥धृ०॥
छाती मुखवटे भुजा बाहुटे, कर कर्दळीचा कंद ।
आखार कंबर बारीक अरुंद ।
भुवया कमाना, डोळे हिंगुळे, गाल गुलगुलीत बुंद ।
दोन्ही कुच कुसंब्याचे गेंद ।
पेंडी तनमणी खिचडी (?) करोनी लोलक हा बिलंद ।
नाकीं नथ चमके गोविंद ।
नार भरपणांत, नाहीं यौवनांत, आले दिवस जवळी ॥१॥
खांद्याहून पदर रुळतो भुईवर, उघडे दोन्ही आंगठे ।
चोळीवर चमके काठ गोठे ।
राव्यावाणी नेत्र गरगरा मारी संगीन सपाटे ।
दरदरा घाम अंगांतुन लोटे ।
स्वार पायदळ हुजरे बारगीर अंबीर मोठे मोठे ।
वेडे झाले पाहून गेंदगोठे ।
तान्हेल्यास पाणी, भुकेल्या जेऊं घाल, आम्हां भोजन पाणी ॥२॥
शके १७३९ ईश्वरी नाम संवत्सर ।
न्हाणु मोत्यानें पठी पसर (?) ।
शहर चिनापट्टणका सुरूंग पैठणका पेठेचे कवीश्वर ।
चुणगे शब्द सुगंधी केशर ।
काय जेऊं घालू ? कसे जेवितां आंबेमोहोराचे खासर ।
अस्सलची कधींच येइना सर ।
बोललीस रसाळ, कर मन उसाळ, बाध प्रीतीच्या पवळी ॥३॥
गेलें मन मिळून शर्करा आळुन दुधामधिं मिसळलें ।
मजवर लई लई मन पाघळलें ।
चमचमाट बिजलीचा थाट, ढगांतुन कोसळलें ।
कसे दयाळा दिवसा दिवटी पाजळले ? ।
छातीवर डुलत बोलत चालत मेहुणपुर्‍यांत वळले ।
सजणाच्या नाहीं वचनाला टळले ।
या हो घरांत, गेले मंदिरांत, सर सर सखा कवळी ।
सगनभाऊ म्हणे, विठठल राउळीं ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel