छपरपलंग शृंगारून कां ग घरीं नाहीं प्राणसखा ग ? ॥धृ०॥
मज घालुन प्रपंचघोरीं गेले साजण सखे नौकरीं ।
होतों दोन जीव संसारीं, झाली फुटाफूट निर्धारीं ।
सांगतीं कधिं न वज (?) भारी, परतशील कधिं माघारीं ?
काय करूं या इतर सुखा ग ? ॥१॥
रूपसुंदर सगुणा रे, तुजवाचुन भोगुं कुणा रे ? ।
जळो मखमुली बिच्छोना रे, तळमळते नीच येइना रे ।
राजस कुणि जाउन आणा रे, किति आवरूं तरुणपणा रे ? ।
हरल्या बाई तहानभुका ग ॥२॥
केलि स्वारी ऐन हिवाळी, वाईटबरी करून दिवाळी ।
तधींपासुन नाहीं शुद्ध हे जाली (म) आहे (?) पुरतें पाप कपाळीं ।
धाडिते पत्रें सांजसकाळीं, कसें करित असेन रुतुकाळीं ? ।
मारिते भलत्यातें हांका ग ॥३॥
लागलें पिसें पुरतें मनीं रात्रंदिवस चुरमुरते ।
बोलते हसुन वरवरते धीर देउन काम आवरते ।
तूं तिकडे मी इकडे मरते, भेटशील कधीं ? वाट पाहाते ।
नका भरूं कुणि भांग टिका ॥४॥
गंगु हैबती म्हणे तो हौशी गुणसगुण राजविलासी ।
मन मानले त्या देशीं भोगिता सुख, नाहीं उदासी ।
महादेव गुणरासी करि जडण प्रभाकर खाशी ।
नाहीं जोडा आणिक तुम्हां ग ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel