सख्या तुम्ही चंद्र, मी चांदणी । प्रीत चालूं द्या सदा फिदा, किती करूं तरी मनधरणी ? ॥धृ०॥

धरीन पदरासी एकांतीं । तीळ तीळ झिजलें मास, आशेची निराशा या वक्तीं । तुम्ही प्राणाचे संगातीं । बसुन ताजवा तोल बिनमोल तुझी कांती । कमळण पाण्यामधिं खुलती । सुवासिक सुगंध, बघुन चोचल्या घाईच्या वक्तीं । मनीं झुरते मोरावाणी । शांत बसा जयवंता बसा येकांत माझे धनी ॥१॥

शपथ घालीन रघुनाथाची । वेड लागलें मला, भुकेली तुमच्या वचनाची । चटक लागली या स्वरूपाची । घटकेंतून नऊ रंग वृत्ती चालवा उभयतांची । लाज कांहीं धरा क्रियेची । आशावंत मी कांता करिते आठवण रायाची । अलाबला किती घेऊं ? तन्मय झाले पाहुनी ॥२॥

भेट आज झाली लई दिवसा । लालाजी लालडी सुंदरा टाकी उसासा । घातला विषयाचा फासा । क्रियाभाग कोठें राहिला, जाळीं गुंतला मासा । मला घेऊनी पलंगीं बसा । घ्या पानाची विडी घ्या, घडी मग मजवर रुसा । नका दु:ख देऊंअ असा मनीं । मदनबाण चेतला बोलती रत्नाची खाणी ॥३॥

बसा पलंगावर मनमोहना, चकचकाट लखालोट अंगावर घालिते गहिना । तुम्ही पोपट, मी मंजुळा मैना । कवळुन धरते आतां माझ्या मलयगिरी चंदना । आशा मज नाहीं तुमच्या धना । भोगा एकांतीं बसून, तुमच्या फेडिन कल्पना । समजला रतन हिरे खाणी । रामा गाती, गवळी भेती, थिजले पाहुनी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel