चला चला पलंगावरी । हातीं फुलाचा गजरा घेउन तुरा खोविला शिरीं ॥धृ०॥

अहो प्रियकर माझे पति । प्रीतीचें लक्षण जाणतां आनंदमय चित्तवृत्ति । नाजूक लहान आकृति । एकसारखा झोक पतीचा, मी पिवळी शेवंती । चाल । दिसे पाक सुरत कामिना । लाली शोभे वदना । काय वर्णूं चांगुलपणा ? । कवळे लहान जोबन उरीं ॥१॥

नार विषयामधिं लंपट, सरळ नाक झुमकेदार नथ, निवळ पोवळे ओठ । नेसून पातळ वर बुट, पायं पोल्हारे घुंघर वाजती जोडवी आनवठा । चाल । बांधून बुचडयाची लटक । काय शब्द बोलते तुटक । कुणी करिना तिजला अटक । धनद्रव्य अनकुळ घरीं ॥२॥

गरतीचा थाट करून । दीड मजला पैठणचे पातळ पदर घे सावरून । माणिक चौकामधिं ठरून । इष्कबाज भुलविले कैक जाती वरून मरमरून । चाल । अशी रूप नादर फुलझडी । दिसे लालाची लालडी । छबदार हातामधिं छडी । चाले ठमकत झोकावरी ॥३॥

कोमळ कांति नादर । हर जिनसाची सेज फुलांची करिते पलंगावर । चिमण्याची गादी वर आईन्या महाल । चकचकाट खुलला वर काढुनी तसबीर । चाल । सुंदरा वाट पाहतां । साजणा आले अवचित । समजावी नार अनुचित । रामा गातो रंगभरी । प्रसंगीं रतिपति कोणा गुणाला धावुन ये लवकरी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel