ये ग ये सखे पलंगावरती ।
जिव धीर न धरती ॥धृ०॥
गोरा देह ओतीव कंचन कैसी । जशी उंच मुकेसी
भरलें तारुणपण आलें शिगेसी । कधीं भोगुं देसी ?
अवघ्या नारींची रूपें दिपविसी । तुं पद्मिणवंशी
उचलुन घ्यावी कडेसीं । कांहिं मग नको, वासना मरती ॥१॥
तुझी ग गोड प्रीत मोठी कळली । जशी जिलबी तळली
पाहतां दिव्यानन, दृष्टी वितळली । मति अमची चळली
अवघ्या भोगुन तूं मात्र वेगळाली । तीच आज मिळली
दैवी प्रीतिरस गळली । जाते घडि सुखाची सरती ॥२॥
फिरलें मन, तुजला गडे राखावी । कशि तरि टाकावी ?
प्राणीमात्रानें वाखाणावी । चांगली म्हणावी
घालुन दरवडा ग चोरुन न्यावी । कुलपीं ठेवावी
अजुन किती विनवावी ? । देखुन तुला लोक बावरती ॥३॥
केवळ बोलणें रसिक रसवाणू । जशि मंजुळ वेणू
धरिलें ब्रीद्र, हें नको लटकें मानूं । कां करसी नानू ?
होनाजी बाळासी नये अनमानूं ।
विषयाची अशी सारा दिवस वानुं ।
बसली चरक जिव्हारीं पुरती ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel