प्राण विसावा जातो कीं बाई ।
ताकुनिया ममतेच्या प्रवाहीं ॥धृ०॥
मी तुझी वनिता प्रियपात्रा । कां मला त्यजितोस सुपात्रा ।
साजिर्‍या या राजिवनेत्रा । चल सुखशयनीं कोमलगात्रा ।
आज ही हारुषाची रात्री । चुकी नसल घडली तिळमात्रा ।
आले हो किंचित चुकी घडली नसे ।
कां करितां अपमान ? आजही आइका लवलाई ॥१॥
माझी विनंती गुणरासी । ऐकतां यावें महालसी ।
कां आली ह्रदयांत उदासा ? । बरी ममता असतां खासी ।
या रीती असतां कां जासी ? । लक्ष हा आवघा तुजपासी ।
सत्फी धन्य मातला । पंचसुराचा झेला । (?)
आरे हो पद पाहुनिया डोंगरीं झुरतो मोर ।
पाण्यावाचुन सुखली जाई ॥२॥
कीं कोण्या सवतीवर रिझला ? । फारच हा तिजसाठीं सजला ।
हा मला खचितार्थ समजला । घोकणी करीत हा देह झिजला ।
रोग ह्या शरीरीं उपजला । घ्या सुरी, कापुन जा मजला ।
आरे हो मज मारुनी अपुले करीं ।
मग जावें स्वामीराज । आरे हो तरी मी दासी खरी ।
सर्वज्ञान सिरताज । कितीतरी वर्णूं चतुराई ॥३॥
निवळले लई विषई नारी । नवनवती जाती सारी ।
उभी हो चपला दारीं । आली गुणिवंताची स्वारी ।
करूनि खासी सेज तयारी । उडविली रात्रिची बहारी ।
आरे हो होनाजी बाळा गुणी । नितगाती छंदी ।
आरे हो ऐकुनिया शत्रु खजीलें जाहाले बेजार ।
कासिनाथ सिरा छंद गाई ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel