सख्या, चल घरिं माझ्या । घरिं माझ्या ।
जीव पायावरि तुझ्या ॥धृ०॥
रात्रंदिस जपते । कधीं येशील म्हणुन टपते ।
हतरूण मज खुपते । सेजेवर देहा रुपते ।
अंतरीं तपते । ही जपमाळ जपते ॥
करिते ध्यानपुजा ॥१॥
कष्टी तरमळते । डोळ्यांतुन जळ गळतें ।
काळिज कळवळतें । जसें गगन कोसळतें ।
तिळ तिळ मनिं जळते । खळखळ दु:ख उसळतें ।
तुझविण नाहीं मजा ॥२॥
ही वस्त सापडली । गांठ उभयतां पडली ।
जडुं नये प्रीत जडली । बरि ममता आवडली ।
नवती पुरी चढली । हिरा हिरकणी भिडली ।
मी पाच, तूं सबज्या ॥३॥
नव्हे कीं रे वरवरची । स्वतां सिद्ध मी घरची ।
मुद्रिका तव करिंची । म्हणती तुझ्या पदरची ।
विनंती परोपरीची । नको म्हणुं बाहेरची ।
मला बुट रेज्या ॥४॥
केलें आर्जवणें । मजला तुला रिझविणें ।
जनाला लाजिवणें । जें लागेल तें पुरविणें ।
होनाजी बाळा म्हणे, स्नेह शेवटीं लावणें
साक्षीला शिवगिरिजा ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel