रात्रंदिस डोळे शिणले या हो माझे घरीं ।
पाहते वाट पक्ष्यापरी ॥धृ०॥
पाहिले मला तुम्हि आधीं बसबसून ।
भोगिले एकांतामधें कसकसून ।
अंतर पडलें तरी कधिं मजपासून ? ।
बिन अन्यायी रुसून तुम्ही कां जातां मजवरी ? ॥१॥
हा काल प्रीतिच्या रसें लोटिते ।
झड घालुन भलत्या मिषें भेटते ।
भोगावें तुम्हांला असें वाटतें ।
दु:ख जवळ नेटतें जेव्हां विषयाचे अंतरीं ॥२॥
येऊन उभी द्वारापसी राहते ।
भिरभिर वाट चौदिशीं पाहते ।
निर्मल आण तुमचेविशी वाहते ।
कामज्वर साहते, असा कधिं पावेल श्रीहरि ? ॥३॥
श्रम जाहले समजावितां या मुखें ।
काद्वैतभाव दावितां पारखें ? ।
तोल सगुण उभयतां सारखे ।
होनाजी बाळा म्हणे, सखे ही प्रीत चालिव पुरी ।
तुसाठीं जीव आमचा हुरहुरी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel