काय करूं मेल्या कामाला ? छळितो माला ॥धृ०॥
आले भर नवति दिस उजवाया । झुरझुरझुरते जीव रिझवाया ।
वैरिण रात्रा जाते वाया । आग लाव या धनमाला ॥१॥
न ये निद्रा शेजेवरते । न पडे चैन येकटपणीं असते ।
हुरहुर हुरहुर चहूंकडे दिसते । त्रासते विषयवर्माला ॥२॥
कठिण समय मदनाचा घुटका । मरणप्राय ती संकटघटका ।
नको नको, कधिं होइल सुटका ? व्यर्थच आट कां जन्माला ? ॥३॥
ह्रदयावर जोबन टकटकले । चोर जसे चोळींत अटकले ।
कसे तरी शरिरास चिकटले । टकले आपल्या कर्माला ॥४॥
भोग भोगि मग सुलक्षणी ती । कोण करिला सौख्याची गणती ? ।
होनाजी बाळा धन्यच म्हणती । जाणती स्वकुळ धर्माला ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel