चंद्रप्रभा फाकली हो रात्र चांदणी ।
भूषणांत रत्न नाहिं आज घरधनी  ॥धृ०॥
पौर्णिमेस शशी शुद्ध अभ्रमंडळीं ।
मशिं विसरून पति आणिके स्थळीं ।
सुकतिल जाई जुई बकुळ पाडळी ।
आंगणांत उभी, हात लावि नीढळीं ।
राहिले निवांत कांत कोण्या सदनीं ? ॥१॥
लक्ष लक्षितां हो पाय, चक्षु ताठले ।
पति-वचनानें पंचप्राण दाटले ।
चित्त चिंतनानें तीन प्रहर लोटले ।
वदन नेत्रबिंदु श्रवति आधो वदनीं ॥२॥
हरण जैशी दग्ध वनीं हिंडे एकली ।
तशि पतिविण दीन धाय मोकली ।
निच्चेष्टित होउन मंचकास टेकली ।
आलें ह्लदय भरून सद्‍गदित शोकली ।
आले गृहिं कांत निकट वेळ साधुनी ॥३॥
द्वारकेंत कृष्ण जसे भामा-मंदिरीं ।
संपादणि करुन शांतवीत आदरी ।
तद्‍वत् हो प्राणसखा भोगि सुंदरी ।
गोविंदराव कवि वसति जुन्नरीं ।
बहिरू बापू तोड तोड गाति शोधुनी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel