दैवाने गांठ जणुं पडलि देवभक्ताची ।
तोडाल प्रीत तरि आण माझ्या रक्ताची ॥धृ०॥
पहिले दिवसापसुन लागला चटका ।
काय सुख सांगावे, ही सोन्याची घटका ।
सकुमार लगी मी केवळ, तुं जरिपटका ।
लागेल लगी मी केवळ, तुं जरिपटका ।
लागेल गरज त्या काळि मला तुम्हि हटका ।
मारितां हतावर हात, न व्हा लटका ।
जाउं द्या निधोन, आला रागाचा झटका ।
नेटका पुरुष चंद्रवर्ण ज्ञानी, पूर्ण स्वरूप सापडलें ।
छळितात, तस्करी तारुण्य आचरतां पुण्य पाठिशीं दडलें ।
सार्‍या गोष्टीला होय, अवधी सोय करून गळिं पडले ।
वाढले दोन कुच नाजुक ह्रदयावरती-टवटवति ।
जाहले वयस्कर आतां अंगि फुरफुरती-नवि नवती ।
निर्लज्याधिर होउन जिवलगा फिरती-तुजभवती ।
घरगुती मिठाई, पहा नव्हे विक्ताची ॥१॥
एक लेशमात्र काहीं अन्याय न घडतां ।
नवरत्न हाराला जडले कां हो विघडतां ? ।
झिजलें मस्तक रात्रंदिवस पाया पडतां ।
करकरुन विनंत्या दमले कान उघडितां ।
बोलतां नये, मजला शब्दांत पकडतां ।
शेजारीं हिर्‍याच्या पाच शोभली जडतां ।
भिडभिडतां तेव्हां अवकाश करून, सावकारा, करिते अर्जी ।
ईश्वरकरणी नाकळे कृपेच्या बळें प्याद्याचे फर्जी ।
हा संगयोग सर्वहि, कसें तें दहि दुधाला विरजी ।
निष्ठुर मर्जि तरी कशावरून मजवरती-ठरवावी ।
लाविलीस लग ती अतां जनांमधें पुरती-मिरवावी ।
घर पुसत अलेली वस्त, कां हो मग दुर ती-करवावी ? ।
पुरवावी निरंतर आशा विषयसक्ताची ॥२॥
अलभ्य लाभ हें माझें वचन सकारा ।
अहो प्राणसख्या, मम सौख्याच्या अधिकारा ।
वर्तल्या प्रीतिचा ताळेबंद अकारा ।
अनमान नसावा माझ्या नांवरुकारा ।
ब्रह्मज्ञ, चतुर, स्वत्‌सिद्ध सुजन साहकारा ।
सायासि मिळाला, नव्हे जिन्नस नाकारा ।
अकरा बारा वर्षापुन सेवा जपुन दशा लोटिते ।
खोटसाल मायाजाल तुंबला गाळ, कळ घोटिते ।
हर्षामधें असतां इथें, जातसा जिथें तिथें गांठते ।
कठिते काळ मी त्रिकाळ तुमचे द्वारीं-अर्जवितां ।
भागले नवस करकरून, देव वेव्हारीं-माजवितां ।
बोलुन भाषणें नानापरि वेव्हारीं-लाजवितां ।
उभयतां जन्मपत्रिका कोर्‍या वक्ताची ? ॥३॥
पदरच्या दासिचा संशय कां हो पडावा ? ।
सार्थकीं देह तुमच्या पदकमळीं जडावा ।
कार्यास हात घालुन मग कां काढावा ? ।
येकांतीं कसा माझा शालु फेडावा ।
स्नेह शरण आल्याचा काय म्हणुन तोडावा ? ।
मजविषयीं सकळ मळ गंगाजळिं सोडावा ।
वाढावा कायावृक्ष, नका करूं रुक्ष दया मजवरली ।
निजनिजतां जाहले धीट, कराग्रिं घट्ट पाउलें धरलीं ।
पद शिवतां तो श्रीराम सगुण निष्काम शिळा उद्धरली ।
भरलि नौका उंच माल पैलतीरासी-उतरा जी ।
मी हजीर असुन तर कां करितां गुणराशी-इतराजी ? ।
जाहले परस्पर त्या कमळण भ्रमरासी-चित्त राजी ।
होनाजी बाळा म्हणे, कर मक्ता उक्ताची ।
लागेल द्रव्य तें घे, हुंडि नक्ताची ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel