या घरांत, उभे कां दारात ? नवती भरांत चढली हाटा ।
जलदिनें झटा, भर लुटा ॥धृ०॥
शिणकरी जणुं दुखणकरि विषय ऋणकरि विषयाचा खडा ।
पडे धरणिवर धडधडा ।
काय करूं ? किं हाय काय करूं ? कोण उपाय करूं ? केला मनधडा ।
हिंव आलें जसें थडथडा ।
दिसरात याच घोरांत, मदन शरिरांत लागला चढा ।
दडदडपुन उरते भिडा ।
दु:ख सांगु तरि कोणापसी ?
उत आला दुध फुसफुशी
विस्तवास दारू जशी
होय त्वरा, चौकशी करा, बळे हा खरा, नका म्हणुं थटा ॥१॥
या हाटांत पडले आटांत महासंकटांत ही दुर्दशा ।
कडकडल्या दाही दिशा ।
भगभगा उष्णा अंगा, आम्ही तर बघा बायका पिशा ।
बेबहार दाटली निशा ।
जळे आंग जसा बचनाग, दु:खाचा विभाग माझ्या हिशा ।
आणिक कां रे जगदिशा ? ।
बोलते उगिच बडबडा
काळिज उडते तडतडा
हा कढ येतो कडकडा
जीव आकांत करितो लोकांत, घडवा एकांत, उडवा घटा (?) ॥२॥
भावेना, कोठें जावे ना, कांहीं खावे ना, विरह काहावला ।
कंदर्प सर्प चावला ।
आलिजाहा ! होतसे डाहा, पहा उर माझा धडकावला
कोणीं सोमल अंगीं लावला ? ।
आवरा तो मद बावरा, बरा वैर्‍यास वेळ फावला ।
पंचानन सरसावला ।
थिरकंप सुटे थरथरा
येतात कळंम गरगरा
जोबन फुगले दरदरा
विलंब कां ? व्यर्थ का हाका ? विरजला चखा, दह्याचा मठा ॥३॥
व्यापला काम तापला, प्राण आपला घेतला हातीं ।
धड नाहीं मेली जिती ।
देहकथा नका धरूं तथा जन्म तों कथा, मि सांगुं किती ? ।
घ्या घ्या मिळली आयती ।
ते ताव, मारला डाव दोघे एकभाव भोग भोगिती ।
आनंद उभयता चित्तीं ।
होनाजी बाळा म्हणे, आतां भरसराइ आली हाता ।
निर्दोष जाहाली मुक्तता ।
धोताल करितसे ख्याल, घे घ धनमाल लाविला धटा ।
पाच्छाई शिक्का बिनबट्टा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel