तुझि तुझि किती म्हणुं ? सख्या, मजवर कां रुसशी ?
खरें लटकें किती पुसशी ? ॥धृ०॥
प्रीत घडली तुझी माझी तेव्हां सुख विशेष जाहलें ।
आतां हे दिवस कसे आले ? ।
प्रत्यक्ष शिर कापलें तरी मी कांहीं न बोले ।
तरी कां मग देतां झोले ? ।
वेळ अवेळ नाहीं म्हटली निजनिजतां मेलें ।
असे अर्जव तुमचे केले ।
तरी म्हणतां ही लटकी
रुसतां घटकाघटकीं
भोगित फिरतां बटकी
विषयचतुर नेटकी, खरा मम प्रियकर असशी ॥१॥
बहुता दिवशीं भेटले तुला, आनंदमय दोघां
जसा पुर गंगेच्या ओघा ।
कधीं येशी घरीं, कधीं नाही, रस नवती भोगा ।
सख्या, तूं वळवाच्या मेघा ।
अळमळित भाषणें मशिं कशि करितां सांगा ।
जशा पाण्यावरल्या रेघा ।
तिनतिनदां घरीं येतें
लागल तें मी देते
माया लावुन घेते
मनामधें चिंतितें तुझी लागली असोशी ॥२॥
पहिल्यानें चांगलेपणीं रत झाला शेजे ।
आतां कसें वाइटपण साजे ? ।
त्रिविध लोक बोलती मला, तुम्हि घरचे राजे ।
ढोल हा दोहिकडे वाजे ।
फार दिवस भोगिल्यावरी जड वाटे ओझें ।
चालवा घरीं बसल्या माझें ।
उठतां, बसतां स्मरते
मन फिदा तुम्हांवरते
जेव्हां जें हवें तसें करतें
वरवरते मोहुन माझी पाहातां कसोशी ॥३॥
आजपावेतों निभावलें, आतां कशी सोडूं ? ॥
नका हो धड फडकें फाडूं ।
प्राणाची संगतिण तुझ्या, किती ममता जोडूं ? ।
दिनाभरि केवढा वेळ आरडूं ? ।
जें विधिनें भाळीं लिहिलें तें कैसें खोडूं ? ।
उभयतां मन संशय तोडूं ।
निश्चय माझा पाहणें
निर्मळपणीं हो राहणें
मी वेडी, तुम्ही शाहणे ।
होनाजी बाळा म्हणे, प्रीतीची नित्य वर्दळ सोशी ।
तरि जगीं धन्य सखे होशी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel