गुजगोष्टी कुठवर सांगूं ? ।
किती तुमच्या पाईं लागूं ? ॥धृ०॥
मजवर तुमचें मन रिझलें । सारा वेळ जवळ निजलें
भाषण करितां मुख झिजलें । घामानें ह्रदय भिजलें
प्रीत नवनीत घृत हें थिजलें । या पाईं सर्व त्याजिले
केवढा वेळ रात्रीं जागूं ? ॥१॥
तुम्ही नित माझ्या घरि यावें । सुखशयनीं सुरत व्हावें
कधीं मधीं तरी भेटत जावें । मजविषयीं कांहीं न भ्यावें
ताकानें दुध विरजावें । पडलें तें पदरीं घ्यावें
सापडलें तें नये त्यागूं ॥२॥
मजवर कां रागें भरतां ? । केलें तें कसें विसरतां ?
तुम्ही सागर, मी तव सरिता । जिव माझा तुम्हांवर्ता
दिस अवघे जाती झुरतां । शिरीं ठेवा हात पुरता
सांगा मी कशी तरी वागूं ? ॥३॥
हुकुमामध्यें तुमच्या असतां । मग सख्या, कां हो रुसतां ?
कस लावुन कसणी कसतां । शेजारीं जवळ बसतां
होनाजी बाळा पुसता । म्हणे सखये बळे (बोल ?) हसतां
सुख कवणापाशीं मागूं ? ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel