पति टाकुनि जातो गावा । कुणि तरी राहावा । संचित कर्माचा ठेवा । काय तरी देवा ॥धृ०॥

सण दिपवाळीचा आला, आनंद झाला । इष्काचा डोम पाझरला, सांगते त्याला । पार नाहीं माझ्या दु:खाला, डोंगर कोसळला । चिकासी हुरडा आला, भ्रांत कशाला । कांहीं केलें कमी तुम्हांला धनद्रव्याला । मग प्रवास नको अपल्याला, घोर जिवाला । तुम्ही तिकडे, मी इकडे . कुणास करूं धावा ? ॥१॥

तुम्ही सुखसमुद्र, मी कांता कोमळ तुमची । तुम्ही नेत्र, मी बाहुली, धुळ चरणाची । तुम्ही गुलाब, मी शेवंती, हवा बागाची । तुम्ही चंद्र, मी चांदणी सत्यवचनाची । तुम्ही जंबिया, मी तलवार धार पट्टयाची । खुणमुद्रा ठसली ही अक्षर ब्रह्माची । पोटच्या लेकरावाणी लोभ ठिवावा ॥२॥

जायचें नाव निघताच कपाळ उठते । उभें वारें सुटतें तिळ तिळ काळिज तुटतें । हरणीला गवसलें फाशीं शरीर कंठते । तशी गत मज झाली, उभें वारें मज सुटतें । मुखचंद्र पहा ना, इष्कामधिं लटपटते । ही मूठ भरमाची जनलोकामधिं फुटते । छातिसी छाती मिळूं द्या, बेत ठरवावा ॥३॥

आली ममता अंत:करणीं सखीला धरुनी । मिठी घालुन पतिच्या चरणीं करी मनधरणी । पाहिलें उभयतां सखिला नेत्र भरुनी । जायाची कल्पना हरुनी मन थीर करुनी । नको करूं चेडे चेटुक करुनी भवते फिरुनी । रामा लिंबाची (?) धरणी विठ्ठल स्मरणीं । नित प्रसंगांत गुण घ्यावा हरि अठवा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel