सारी रात्र भोगिलें, हौस नाहीं पुरली, धरलें करीं ।
अरुण उदय जाहला प्रभाकर, पहाटे उठा लवकरी ॥धृ०॥
भोळ्या राजसा, भांगी पुरसा आती तुमचा स्नेहे ।
मायेनें गोविलें, परंतु मला बोलतां न ये ।
मन तुमचे खोसीवले, खुशाल झाला सुकात दीहे ।
आतां उजाडेल, कशी मी जाऊं ? मला वाटते भये ।
मायबाप भाऊबंद दीरभावाचे जपती हाये ।
न कळे, बातमी त्याला कळेत, पडला असेल संशये ।
आधिं म्या सांगितलें, नाहीं आयकिलें तुम्ही ।
गोवु व्यसनीं मला कसें पाडलें भ्रमीं ? ।
इतके कां हो सख्या, मसाठीं व्हाल श्रमी ? ।
ठसलें कीं हो आज मनामधिं करा योजना बरी ।
तुम्हा दुख देणार नाहीं, दु:ख भोगीन शरिरांतरीं ॥१॥
उठून बसावें प्राणविसाव्या, नका कवेमधिं धरूं ।
जीव माझा कासावीस होतो, आतां मी काय करूं ? ।
हात काढा, छातीवर जोबन घेतलेस चुरचुरू ।
आंग चुकवून एकीकडे होतां पुढं येतां सरसरू ।
धनलोभ्याला अवचित गवसे जशी मालाची चरू ।
तसे गवसले कांहीं तुम्हांला निजवितां धरधरू ।
सख्या लई गोडी तुम्हां विषयकर्माची ।
वेळघटका चुकली नित्यनेमाची ।
शपत घालीन आतां राजारामाची ।
रोज यायाची आस्ता, नका हो मोडूं राजेश्वरी ।
दुसरे दिवशीं चैन भोगा वरल्या माडीवरी ॥२॥
सखा म्हणे, हे राजसवदने, कशी जाशील येकटी ? ।
शिणगारामधिं डुग पीतांबर पिवळा कसला कटी ।
पुष्कळ देतो मोती पोवळी हिर्‍याची आंगठी ।
मर्जी आमची सखे, भरूं पुतळ्यामोहर्‍यांनीं वटी ।
आणिक येक सांगतों तुझ्या पाठची बहिण धाकटी ।
येक रात्र कर माय तु चा (?) पुढें विचार सेवटीं ।
आज्ञा द्यावी मला राव राजेन्द्र धनी ।
बुरखा देऊन मला पाउवा शाणी ।
माझी बहिण आहे मजपशीं सुज्ञानी ।
दोघी बहिणी मिळून मनसुबा बसुन करूं क्षणभरी ।
अस्त्रीचरित्र अधिक राजा हीकराम आनला आम्ही ॥३॥
आईक सुमित्रा परमपवित्रा देह तुला अर्पिली ।
वनभोजनास जावें, पण वेळ आस्ता राहिली ।
गुप्तरूपी न कळे कोणाला महालांतून येकली ।
बाण जिव्हारीं लागून गेला, आठवण करूं लागली ।
खुशी होऊन आपल्या बहिणीला हर्षयुक्त भेटली ।
मागिल साकल्य वर्तमान अवघा सांगूं लागली ।
चिंता नका करूं, मी बोलेन बरवे ।
नेसवीन सासुला उंच पातळ हिरवें ।
तुजवर हेत आहे, दोष काहाडीन मी सरवे ।
सगनभाऊचें कवन ववण मोत्याची कशी ग रसभरी ।
उभे थव्यावर थवे, चुकवती मालाच्या लावणी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel