विनवी सख्या, पहिलवानकी किति वर्सं करिता ? सांगा मजपशीं ।
सहज आले रंगमहालांत, मजला आवळुन धरतां कशी ? ॥धृ०॥
लगन हो झाल्यापासुन आजपर्यंत होता दुरदुरुन ।
तेव्हां होतें अज्ञान, सात वर्सांची मी होतें पूर्ण ।
तशीची बोळवण करून आणली मायबापाचे घरून ।
झालीं पाच वसें न मजला नेलें परतून ।
सासुसासरे जावानणंदाचें राहिलें मन धरून ।
माझी लळापळती, गेलें माहेरचें सुख विसरून ।
धाकटी नणंद बोलत होती । तुमच्या रंगमहालाचं किती ।
चित्र काढलें भिंतीवरती । तें ऐकुन ठिवलें म्या चित्तीं ।
वारसारा करून आले येकांतीं याव पहायासी ॥१॥
बाळपणांपासून आम्ही ग नारी तालीमखान्यामधीं ।
काच्या भिडवून कसरत काढीत होतां आखाडयामधीं ।
मुगदुल लेजिम फिरवित होतों दोन्ही ग हातांमधीं ।
दांडपट्टा नारी खेळत होतों आम्ही ग गडयांमधीं ।
बदाम-चण्याची दाळ भिजवुन खातों ग दुधामधीं ।
नित हा अमचा खुराक दुध, आम्ही आहों ग जोरामधीं ।
गुरुचें वचन ऐकून । राहिलोंग ग धीर धरून ।
पण होतों ग दुर्धर धरून । पंचविसी आली ग भरून ।
कधीं येकांतीं नाहीं भेटली ग प्रिये तूं आम्हांसी ॥२॥
जा कर्दळीचा गाभा, तनु माझी ही नव्या नवतीची ।
मी कोमल सकुमार, काया ही लहान माझ्या वयाची ।
बळत्कार कंरु नका, सख्या ही घडी नव्हे भोगाची ।
जाउन खालतीं पाहुन येते, आण तुमच्या पायाची ।
सासुसासर्‍या जावानणंदा तसे दीर भावजयाची ।
येइल कुणी अवचित, कडी लावुनी येते दाराची ।
का अधीर इतके तरी ? । सारी रात आहे बारी ।
निजा घेउन शेजेवरी ।
घरची जागी मणसें, अतांची घडी टाळा हरकशी ॥३॥
बहु काकुळती य़ेऊन सखयासी सुंदरा अर्जवी ।
मी तुमची वल्लभा, माझी करुणा येउंद्या कांहीं ।
तशिच सोडून दिली, कानोसा घेत गेली ठायीं ठायीं ।
बंदोबस्ती करून घराची चढुन आली लवलाही ।
तेव्हां देखुन, प्रियानें अलिंगुन धरली तिशीं ह्रदयीं ।
कवळी माझी काया सख्या प्रीतीनें भोगावी ।
तो ज्वान जवान गडी । आली मदनाची हुडहुडी ।
केली सर्वांगाची घडी ।
घडिघडि येते हो काकुळती, जिवदान द्या हो सखया मशी ॥४॥
इच्छा पूर्ण झाली, कमळीणीवर भ्रमर लुब्धला ।
नव्या नवतीचा भर ज्वानीचा लुटुनशानी घेतली ।
जशी चापयाची कळी सुकली, मुखचंद्र उतरला ।
मुखमार्जन करून विडा गंगेरी मुखीं हो घेतला ।
हातीं घेउन दर्पण न्याहाळी ती आपले स्वरूपाला ॥
भांग बिजवरा सर्व शिणगार तिनें हो सरसाविला ।
राजहंसाची हंसिनी । जशी हिर्‍यांतील हिरकणी ।
जे जवी (?) दोघे बसूनी ।
सिदरामा लहेरी, अरे तुर्‍यावर कलगी झाली खुशी ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel