भाउबंद गणगोत आप्तहि तुंच आमची सारी ।
तुजपरते सुख अणिक दिसेना या नरसंसारीं ॥धृ०॥
तुजविषयीं अम्हि अधिर, फार दिस जिव पडला बंदी ।
येकांतांत निर्वेध सुखाची येइल कधीं संधी ? ।
निसंग रत बापुडे अम्ही तर या पडलों फदी ।
देखुन शक्ती कसे लागले दाव्यावर दंदी ? ।
सर्वत्याग पावलों विमरथ (?) (विनार्थं ?) प्रीतीच्या छंदीं ।
तुजपाशीं तिष्ठतों ईश्वरापुढें जसा नंदी ।
अनंत जन्मोजन्मीं निंजु दे येकांतीं शेजारीं ॥१॥
पाहुन अशि गुणवान सकळ संधान विरलों गे ।
उतराई व्हावया दिसेना कांहीं तुझ्या जोगें ।
तुजकरितां व्याधिस्त व्यापिलें शरिर विषयरोगें ।
आठोप्रहर येक येकांती चल निंजू दोघे ।
आणिक वनचर व्याघ्र जसा फिरे दरवेशामागें ।
नेशिल तिकडे तसे येतों, मग निष्ठुरता कां गे ? ।
कृतनिश्चयता ठेव आपला देव साहाकारी ॥२॥
इक्षुदंड चरकांत तसा देह तुझे कारणीं लावूं ।
वाइट कीं चांगले, अतां हें नको सखे पाहूं ।
वागविलेस आजवर जसा तळहाताचा बाऊ ।
तें आठवावें, काय प्राण हा मेला तुज दाऊं ? ।
विषय कांच लागला जसा तो चंद्राला राहू ।
तसे गरिब जाहलों जिवलगे, दूर नको जाऊं ।
शरण अलों, दे दान, जसा पांगुळ हाक मारी ॥३॥
मनची हौस कधीं पुरल ? बुडालों या प्रीतीपाईं ।
ओहोळी काहोळी रडे जशी का चोराची आई ।
उगेच बसतां स्वस्थ, अम्हांला घरिं करमत नाहीं ।
ह्रदयांतर्गत सखे होतसे काळिज दो ठाईं ।
अंतरता मायबाप जैसी मुल पाजी दाई ।
त्यापरि माया करी, यावरी मग नको कांहीं ।
विषयप्रसादें एक बोलतों या गोष्टी च्यारी ।
होनाजी बाळा म्हणे, चालूं दे प्रीत परभारी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel