वर्षांची दिपवाळी आलि ग बाइ आनंदाची मोठी ।
प्रियकर नाहीं घरिं, करूं सण कोणाचेसाठीं ? ।
हर्षकृत मनिं लोक अवघे जन-दुनिया सारी ।
सहकुटुंबीं अतिसुखें वर्तती अपले संसारीं ।
पुढें दिवाळी बाइ ग आला सण गजराचा भारी ।
चार दिवस आनंद घरोघर करती नरनारी ।
अशा प्रसंगामधें घरिं नाहीं माझे घरबारीं ।
मजवरिच भगवान कोपला वाटे निर्धारीं ।
किंवा साडेसाति, शनीश्वर आहे माझे पाठीं ॥१॥
दूर मोहिम पहिल्यानेंच गेले परदेशावर ते ।
मी इकडे पाखरासारखी मनिं तिळतिळ झुरते ।
न पडे क्षणभर विसर मला, घडि वर्षांची जाते ।
कोठेंच गमेना म्हणुन भमिष्टावाणीं उगिच फिरतें ।
कठिण करून मग बळेंच आपला जिव अवरून धरतें ।
जाहलि परिक्षा येथुन, माझें दैव फुटलें पुरतें ।
अपार करितां शोक, दु:खाचे येति उभड पोटीं ॥२॥
खंत सख्याची करून वाळले, रोड झाली काया ।
दिसे रोगियावाणी, आली मुखचंद्रावर छाया ।
जाहलीं बारा वर्षे प्रवासिं जाउन पतिराया ।
कसे विसरले ? माझी नाहीं त्यांना तिळभर माया ।
ऐन माझे मजेचे दिवस, तरुणपण ग जातें वाया ।
सखा भेटवा म्हणुन कुणाच्या पडुं जाउन पाया ? ।
करूं काय मी ? झाले साजणी दैवाची खोटी ॥३॥
कर्मकथनगति अशि चित्त देऊन ऐका बाई
पतिविण नांदण्यापरिस हें दु:ख दुजें नाहीं ।
सकळ पदार्थांसहित सदन अवघें भरलें पाही ।
काहीं नको ग आतां, जिव झाला त्राहि त्राहि ।
असे पतिपदीं लक्ष लावितां केवळ दीनप्राई ।
परमेश्वर पावला, घरिं (आले) प्रियकर ते समयीं ।
होनाजी बाळा म्हणे, विसर आतां मागील गोष्टी ।
सुखें सख्याशीं नित्य रमत जा, धर कवळुन पोटीं ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel