भोग दे जिविच्या गुणग्राही ! ।
ठेविला प्राण तुझे पाईं ॥धृ०॥
केली सेवा आजवर म्या हो । आतां जें मागेन तें द्या हो
फावल्या वेळे समयीं या हो । भेट मज गरिबाची घ्या हो
माझें भाषण तरि ऐका हो । जशि मैना करिते टाहो
नाहीं मागत विशेष कांहीं ॥१॥
येथें कां मन तुमचें जातें ? । कोणीकडे न्याल तेथें येतें ।
चित्त पहिलें प्रशस्त होतें । आतां पातळ दिसतें नातें ।
नग्न मी ह्र्दयावर घेतें । उरासि धरुनी मुके देतें
तुम्हिच शिरिमंत, मी अन्याई ॥२॥
हेत मजवर तुमचा कैसा । जसा जळीं बक धरितो मासा
प्रीतिची असले तर पोसा । उपद्रव लागेल तो सोसा
रोज भोगा घटका तासा । कसोटीं देह माझा घासा
लागली प्रीतिची मिठाई ॥३॥
सख्या तूंअ मम जिविच्या जिवना । तुझी कांता राजिवनयना
करि चटपट जिव हा राहावेना । निथळतें जळ माझ्या नयना
होनाजी बाळा म्हणे, मना आलीस पुरती
अमच्या ध्यानीं रहात जा सुखी बारमाही ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel