जीवनावधि त्याचें एकच ध्येय होतें. त्याला अशा प्रकारची समाजरचना निर्माण करावयाची होती कीं, तींत दुष्टता, पिळणूक, बेकारी, आंतरराष्ट्रीय कारस्थानें व युध्दें यांना वाव उरणार नाहीं. या एका ध्येयाच्या पूर्ततेसाठीं त्यानें सारें जीवन वाहिलें. स्वत:च्या सर्व वैयक्तिक महत्त्वाकांक्षा व आशाआकांक्षा त्यानें झुगारून दिल्या. त्याचा बाप मध्यमवर्गांतील सरदारांपैकी होता. सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठांतून परमोच्च यश मिळवून तो पदवीधर झाला होता. भरपूर पैसा व मानसन्मान मिळवून देणारा कायद्याचा धंदा त्याच्यासमोर उभा होता. पण त्याच वेळेस त्याचा मोठा भाऊ १८९१ सालीं क्रांतिकारक चळवळींत भाग घेतल्याबद्दल फाशीं दिला गेला ! लेनिनचें आपल्या भावावर अपार प्रेम होतें; त्याच्याविषयीं त्याच्या मनांत अपार पूज्यबुध्दि होती. भावाच्या बलिदानानें लेनिनच्या जीवनाला अजीबात निराळें वळण दिलें. कायद्याचा धंदा, सामाजिक दर्जा, वगैरे सारें भिरकावून देऊन तो तनमनधनेंकरून पद-दलितांच्या व अकिंचन परित्यक्तांच्यासाठीं आखाड्यांत-क्रांतीच्या समरांगणांत उडी घेता झाला. १८९७ सालीं त्याला गिरफदार करून सैबीरियांत पाठविण्यांत आलें. तेथें त्यानें कॉम्रेड एन्.के.क्रुप्स्काया हिच्याशीं विवाह केला. तीहि त्याच्याबरोबर वनवासांत गेली होती.

१९०० सालीं तो युरोपांत परत आला. त्याच्यामागें कुत्रे सारखे लागले होते. त्याला स्वत:चा देश उरला नव्हता. तो सारखा लिहीत होता, सारखा चळवळ करीत होता. स्वप्नें उमवीत होता, योजना आंखीत होता. ''ज्या दिवशीं फौजफाट्याची वा पाशवी बळाची जरूरीच उरणार नाहीं, कोणीहि कोणालाच गुलाम करण्यासाठीं शस्त्रास्त्रें जवळ ठेवणार नाहीं, समाजांतील एक वर्ग दुसर्‍या वर्गास दडपून टाकण्यासाठीं जुलूम करणार नाहीं'' असा दिवस उजाडावा म्हणून लेनिन अहोरात्र असेल तेथें अविश्रांत श्रमत होता. सेंट फ्रॅन्सिसप्रमाणें त्यानें दारिद्र्याला व हालअपेष्टांना वरलें होतें. जगांतील दारिद्र्य दूर व्हावें म्हणून तो दरिद्री झाला होता. जगांतील क्लेश नाहीसें व्हावें म्हणून तो क्लेश सहन करीत होता. त्याच्या या वनवासकालभर त्याची पत्नी व मैत्रीण क्रुप्स्काया त्याच्याबरोबर त्याच्या हालअपेष्टांत त्याची भागीदारीण होती, त्याच्या महत्कृत्यांत त्याला मदत करीत होती.

१९०५ सालीं रशियांत परत येऊन त्यानें त्या वेळच्या क्रांतींत भाग घेतला; पण १९०७ सालीं त्याला पुन: हद्दपार करण्यांत आलें. तेव्हांपासून १९१७ सालच्या विजयदिनापर्यंत कधींहि त्याला रशियांत पाय ठेवतां आला नाहीं.

निर्वासनाच्या प्रदीर्घ काळांत तो कष्ट सोसण्यास व स्वत:च्या क्लेशांकडे पाहून हंसण्यास शिकला होता. लेनिनचें एक अपूर्व वैशिष्टय म्हणजे त्याचें हास्य. गॅमालिएल ब्रॅडफर्ड आपल्या “Quick & the Dead” या पुस्तकांत लिहितो, ''लेनिनला कोठेंहि भेटा, त्याच्या चेहर्‍यावर हंसे असावयाचेंच.''  मॅक्झिम गॉर्की, बर्ट्रांड रसेल, मिसेस फिलिफ स्नोडन यांच्यावर, येवढेंच काय, पण त्याच्या सान्निध्यांत येणार्‍या प्रत्येकावर त्याच्या हास्याचा जादूसारखा परिणाम होई. कोणाकोणाला त्याच्या त्या हास्यांत कठोरता आहेसें भासे, तर कित्येकांना त्यांत सुखाभाव व आनंद यांचें प्रतिबिंब दिसे. ब्रॅडफर्ड लिहितो, ''तें हास्य मला तरी कोडेंच होतें. मी तरी तें समजूं शकलों नाहीं.''  पण मला वाटतें कीं, त्याचें हसें समजून घेणें सोपें आहे. लेनिन हसें तें तो कठोर होता म्हणून नसे, अगर आनंदी होता म्हणूनहि नसे, तर तो दु:खी होता म्हणून. त्यानें इतकें दु:ख इतक्या उत्कटपणें सोसलें होतें कीं, तो आतां पोटभर हंसावयास शिकला हाता. या मानवी नाटकाला नवीन स्वरूप देण्यासाठीं तो धडपडत होता; पण हा सारा विश्वव्यापक फार्स आहे हें त्याला दिसत होतें. त्याचें हास्य स्विफ्टच्या, हेनच्या किंवा मार्क ट्वेनच्या हास्याप्रमाणें होतें. त्यानें मानवजातीसाठीं स्वत:चा होम केला; पण मानवजात तिच्यासाठीं इतका होम करण्याच्या लायकीची नाहीं हें तो जाणत होता. स्वत:च्या कम्यूनिस्ट बंधूंतहि त्याला असा अनुभव येत असे कीं, ''शेंकडा एक प्रामाणिक असला, तर एकोणचाळीस गुंड व साठ टोणपये असतात.''  गटेप्रमाणेंच त्यानें मानवाची मूर्खता व त्याचें दु:ख हीं तळाशीं बुडून पाहिलीं होतीं, समजून घेतलीं होतीं. ''अश्रूंत हास्य असतें'' हे एका लॅटिन कवीचे शब्द त्यालाहि नीट समजले हाते. लेनिनच्या हंसण्यांत अश्रू असत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel