प्रकरण ३ रें
इतिहासांतील पहिला युध्दविरोधी वीर जेरिमिया
- १ -
मूसाच्या मृत्यूनंतर कांही शतकांनीं आपण जगाचें दर्शन घेऊं या. संस्कृति व सुधारणांच्या दिशेने मानव-कुटुंबाची कांही पावलें टाकलेलीं आपणांस दिसतील. ते पहा फोनिशियन लोक. व्यापाराची व सत्तेची त्यांना फार हाव. मोठींमोठीं लांब-रुंद गलबते त्यांनी बांधली. समुद्रावरून जातांना सुरवंटाप्रमाणें तीं दिसत. भूमध्य समुद्राच्या किनार्याभोवती कितीतरी भरभराटलेली नवीन शहरे त्यांनी वसविली ; गजबजलेल्या वसाहती निर्मिल्या. भूमध्य समुद्र म्हणजे बहरलेल्या बागेंतील जणूं एक लहानसे तळें असें वाटूं लागलें. फोनिशियन लोक अति धूर्त. त्यांना प्रामाणिकपणा ठाऊक नव्हता, सद्सद्विवेकबुध्दि त्यांना माहीत नव्हती. नफेबाजी हाच त्यांचा धर्म व भरलेली तिजोरी हें त्यांचें ध्येय. परंतु त्यांनी नवीन लिपि शोधून काढली. इजिप्शियनांची ती चित्रचिन्हलिपि किंवा सुमेरियनांची ती शरलिपि-त्या साध्या नव्हत्या. फार घोंटाळ्याच्या व अवजड अशा त्या लिप्या होत्या. फोनिशियन लोक व्यापारी व व्यवहारी. त्यांना सुटसुटीत व झपझप लिहितां येईल अशी लिपि हवी होती. त्यांनी लिपि सोपी केली व अक्षरें बावीसच केली. हीच लिपि थोड्याफार फरकानें आजच्या बहुतेक सुधारलेल्या देशांतून सुरू आहे.
फोनिशियन लोक दर्यावर्दी व्यापार करीत होते. आशियांतील कला व हत्यारे ते युरोपांत आणीत होते. आफ्रिकेंतील राष्ट्रांना देत होते. त्याच वेळेस खुष्कीनें व्यापार करणारे कारवानांचे तोंड चीनमधील रेशीम व चिनई मातींचीं भांडी आणून त्याऐवजी मध्य आफ्रिकेंतील हस्तिदंत, स्पेन व ब्रिटनमधून जस्त, तसेंच इतर देशांतून लोखंड, तांबें पितळ, सोन्या-चांदीचे नक्षीदार दागिने, मसाले, मौल्यवान् हिरेमाणकें वगैरे घेऊन जात. हे कारवान पार्शिया व अरबस्तान यांतील वाळवंटातून प्रवास करीत येत.
तो जो पहिला वानरसदृश्य क्षुद्र मानव, त्यांचे वंशज आतां मोठमोठ्या शहरांतून रहायला शिकले होते. सुंदर सुंदर वस्तूंनीं स्वत:चीं शरीरें शृंगारावीं, स्वत:चीं घरें शोभवावीं, आपलीं मंदिरें भूषवावीं असें त्यांना वाटूं लागले होतें. चाकांचा व रंथांचा शोध लागला होता. रानटी घोडा माणसाळविण्यांत आला होता. आतां आपण वार्यालाहि मागें टाकूं असें मानवांना वाटूं लागलें. संस्कृतीची परम सीमा आपण गांठली असें त्यांना वाटलें. मिळवायासारखें आतां जणुं कांहीं राहिलें नाहीं. इजिप्तमधील ज्यूंचें तें महानिर्याण, सालोमनचें मंदिर, ट्रोजनयुध्द व होमरचीं महाकाव्यें-या गोष्टी आतां फार जुन्या झाल्या असें त्यांना वाटूं लागलें. मध्ययुगांतील तीं धर्मयुध्दें जशीं आज जुनीं-पुराणीं वाटतात, तसेंच त्या लोकांना त्या प्राचीन युध्दांविषयीं वाटे.
इजिप्त, असीरिया व बाबिलोन यांच्यांत ज्यूंना आधीं कोण गिळंकृत करतो याची जणूं आतां स्पर्धा लागली होती. आणि सिथियन, इराणी व मीडीस हे इजिप्त, असीरिया व बाबिलोन यांना गिळंकृत करूं पहात होते; पहिला मान मिळविण्यासाठीं धडपडत होते.
ख्रिस्तशकापूर्वीच्या सातव्या शतकाच्या अंतीं आपण उभे आहोंत. पृथ्वीवरचीं बलाढ्य राष्ट्रें एकमेकांचा नि:पात करण्यांत निमग्न आहेत असें येथें दिसत आहे. आणि अशा वेळेस पॅलेस्टाइनमधील एका लहान गांवांत एक तरुण वाढत होता. या सार्या लंढाया म्हणजे मूर्खपणा आहे, असें तो म्हणूं लागला होता.
युध्द-पराङ्मुख अशा त्या नवशांतिवाद्याचें नांव काय ? त्या तरुणाचें नांव जेरिमिया