- ४ -

व्हॉल्टेअरच्या मनांत अशी क्रांति चालू असतां त्याचें बाह्य जीवन नेहमीप्रमाणें अशान्तच होते. फ्रेडरिक दि ग्रेटचा साहित्यिक चिटणीस म्हणून त्याची नेमणूक झाली होती. तो फ्रेडरिकशीं मांडला व त्याला पुन: फ्रान्समध्यें पाठविण्यांत आलें. फ्रेंच क्रांतीचें वातावरण तयार करणारे डिडरो, ड'अलेंबर्ट, कॉन्डॉसेंट, वगैरे नास्तिक ज्ञानकोशकारमंडळींना व्हॉल्टेअरहि मिळाला. डिडरो प्रभूति सारे लोक जुन्या विचारांना व जुन्या रूढींना धाब्यावर बसविणारे होते. ते जुन्या मूर्ती फोडून नवीन विचारमूर्ती देणारे होते. व्हॉल्टेअरनें ''स्वतंत्र विचाराचा ज्ञानकोश'' तयार करण्याच्या कामीं त्यांना मदत केली. ज्ञानकोशकार त्याला सनातनी म्हणत, आस्तिक म्हणत आणि सनातनी त्याला नास्तिक म्हणत. आणि या दोघांच्या मध्यें तो उभा होता. त्याचे हात कामानें भरलेले होते. इतिहासाचें तत्त्वज्ञान, तत्त्वज्ञानाचा कोश, वगैरे शेंकडों पुस्तकें लिहिण्यांत तो मग्न होता. तरीहि अन्याय व छळ दिसतील तेथें तेथें लेखणी घेऊन लढावयाला तो सदैव सज्ज असेच. सेंट बूव्हे लिहितो, ''प्रत्येकजण व्हॉल्टेअरकडे येई. कोणी त्याचा सल्ला मागत, कोणी त्याला आपल्यावर होणारे अन्याय निवेदीत व त्याचें साह्य मागत. तो काणासहि नकार देत नसे, निराश करीत नसे.''

त्याला मनानें वा शरीरानें बरेच दिवस विश्रांति घेणें अशक्य असे. वयाला त्र्याऐंशीं वर्षे होत आलीं तरीहि जीवनांत प्रत्यक्ष धडपड करावी, स्वस्थ बसूं नयें असें त्याला वाटे. आपलें मरण जवळ आलें असें वाटून तो पॅरिसला अखेरची भेट द्यावयाला म्हणून आला. पॅरिसमध्यें त्याचें स्वागत झालें तें जणूं ऐतिहासिकच होतें ! पण हा सारा प्रवास, हें भव्य स्वागत त्याच्या प्रकृतीस झेंपलें नाहीं. त्याच्या स्वागतार्थ रंगभूमीवर केल्या जाणार्‍या एका नाटकाला डॉक्टर 'जाऊं नका' म्हणून सांगत असतांहि तो गेला. सार्वजनिक रीत्या त्याचें तें शेवटचेंच दर्शन होतें.

तो मृत्युशय्येवर होता. एक धर्मोपदेशक त्याचा कबुलीजबाब घेण्यास आला. पण व्हॉल्टेअर म्हणाला, ''रोमन कॅथॉलिक चर्चवर माझी श्रध्द नाहीं. मी ईश्वराची प्रार्थना व पूजा करीत मरतों. मित्रांवर प्रेम करीत पण शत्रूंचा द्वेष न करतां रूढींचा तिरस्कार करीत मी देवाकडे जातों.''

पॅरिसमध्यें त्याला ख्रिश्चन धर्माप्रमाणें अंत्य संस्कार मिळाला नाहीं.

- ५ -

इंग्रजांवरील पत्रांत तो एके ठिकाणीं लिहितो, ''ऐझॅक न्यूटन हा सर्वांत मोठा मनुष्य होय. तो सर्वांत मोठा कां ? कारण, आपण त्याच्याचबद्दल मनांत पूज्यबुध्दि बाळगतों, जो सत्याच्या जोरावर आपलीं मनें जिंकतो. बळजबरीनें दुसर्‍यांचीं मनें जिंकूं पाहणारांना आपण मान देत नाहीं.''  न्यूटनबद्दल व्हॉल्टेअरनें लिहिलेले शब्दच व्हॉल्टेअरच्या मृत्युलेखासाठीं उपयोगीं पडण्यासारखें होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel