एकदां तर त्यानें एक फारच मोठी गंमत केली.  दारू पिण्याची मॅराथॉन शर्यत लावून सर्वांत जास्त दारू पिणारास त्यानें सोन्याचा मुकूट बक्षीस म्हणून ठेवला !  ज्यानें तो सुवर्ण-मुकुट मिळविला तो तीन गॅलन दारू प्याला होता !  पण त्या नशेंतच तो मेला.  दुसरे एकेचाळीस जणहि त्या दारूच्या स्पर्धेत भाग घेऊन मरण पावले.एकदां नाचरंग, मेजवानी असा स्वैराचार रात्रंदिवस सारखा चालल्यामुळें तो तापानें आजारी पडला व थोड्याच दिवसांनीं ख्रि.पू. ३२३ या वर्षी तो मरण पावला.  मरण-समयीं तो केवळ तेहतीस वर्षांचा होता ; पण येवढ्या लहान वयांत इतके देश उध्वस्त करणारा, मानवांवर इतके अन्याय करणारा, त्यांच्यावर दु:खांच्या इतक्या प्रचंड राशी ओतणारा, त्यांच्या अशा कत्तली करणारा प्राचीन इतिहासांत दुसरा कोणी आढळेलसें वाटत नाहीं.एकदां नाचरंग, मेजवानी असा स्वैराचार रात्रंदिवस सारखा चालल्यामुळें तो तापानें आजारी पडला व थोड्याच दिवसांनीं ख्रि.पू. ३२३ या वर्षी तो मरण पावला.  मरण-समयीं तो केवळ तेहतीस वर्षांचा होता ; पण येवढ्या लहान वयांत इतके देश उध्वस्त करणारा, मानवांवर इतके अन्याय करणारा, त्यांच्यावर दु:खांच्या इतक्या प्रचंड राशी ओतणारा, त्यांच्या अशा कत्तली करणारा प्राचीन इतिहासांत दुसरा कोणी आढळेलसें वाटत नाहीं.

- ७ -

अलेक्झांडरचें अवास्तव स्तोम माजविणार्‍या इतिहासकारांनीं त्याच्याभोंवती एक तेजोवलय निर्माण करून ठेवलें आहे.  जें जें उच्च आहे, थोर आहे, सद्‍गुणी आहे, त्या सर्वांची आदर्शभूत मूर्ति म्हणजे अलेक्झांडर असें त्यांनी लिहून ठेवलें आहे.  नवनवीं पुरें-पट्टणें वसविणारा, रानटी जातींना माणसाळविणारा, राष्ट्राराष्ट्रांत व्यापार वाढविणारा, रस्ते बांधून दळणवळण वाढविणारा, इत्यादि प्रकारें त्याचें वर्णन करण्यांत येत असतें.

परंतु अशा या दुष्ट-शिरोमणीला, या हडेलहप्प सैतानाला, अशा रीतीनें दिव्य संतपण दिलेलें पाहून शिसारी येते !  संस्कृति, सुधारणा यांचा थोडाहि विचार या घमेंडखोराच्या डोक्यांत येत नसे.  अलेक्झांडर फक्त अलेक्झांडरलाच पूजी.  अलेक्झांडरचीच पूजा, अलेक्झांडरचीच स्तुति !  त्यानें शहरें बांधलीं तशींच धुळीसहि मिळविलीं !  ती उभारणी वा संहारणी त्याच्या स्वत:च्या वैभवासाठीं होती.  मानवजातीचा विचारहि त्याच्या डोक्यात शिरत नसे.  जी थोडीफार शहरें त्यानें वसविलीं त्याबद्दल त्याचे पोवाडे गाण्यांत येतात; पण त्यानें शेंकडों शहरांची राखरांगोळी केली त्याचें काय ?  अलेक्झांडरच्या युध्दांमुळें ग्रीक संस्कृतीचीं बीजें आशियाभर पेरलीं गेलीं असें मानणें हा केवळ मूर्खपणा होय.  वस्तुत: त्यानें संस्कृतीचीं बीजें पेरलीं नसून सूडाची, द्वेष-मत्सरांचीं व भावी युध्दांचीं मात्र बीजें सर्वत्र पेरलीं.  युरोपची संस्कृति पूर्वेकडे पसरली ती खरोखर अलेक्झांडरच्या तरवारीमुळें नव्हे, तर सोलोन, हिराडोटस, प्लेटो यांसारख्या ग्रीक कवींनीं व तत्त्वज्ञान्यांनीं केलेल्या कामगिरीमुळें.  जग सुधारावें, तें अधिक उदार व सुसंस्कृत करावें, त्याची अधिक चांगली सहकारी संघटना करावी, अशीं भव्य ध्येयें अलेक्झांडरच्या डोळ्यांसमोर कधींहि नाचलीं नाहींत !  अशा ध्येयांनीं त्याचें अहंकारी मन कधीं उच्च बनलेंच नाहीं.  आपल्या बुसिफालस नामक घोड्याला त्यानें जसें फटके मारून वठणीवर आणलें, त्याच्यावर स्वार होतां यावें म्हणून त्याला ज्याप्रमाणें माणसाळविलें, त्याप्रमाणें मानवांवर आपणाला सत्ता गाजवितां यावी म्हणून त्यानें त्यांना तरवार दाखवून हीन-दीन केलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel