- ४ -

ग्रीकांना व रोमनांना उत्क्रांतीचें तत्त्व अज्ञात नव्हतें हें आपण एपिक्यूरसवरील प्रकरणांत पाहिलेंच आहे. पण ख्रिश्चन धर्म येतांच उत्क्रांतीचा विसर पडून बायबलमधील सृष्टयुत्पत्तीची कल्पित कथा खरी मानली जाऊं लागली. गॅलिलीच्या कल्पनाप्रिय कोळ्यांच्या संगतींत मानवजात जणूं शास्त्रीय दृष्टि विसरून गेली, गमावून बसली ! ती शास्त्रीय दृष्टि परत येण्यास व तिला गति मिळण्यास अठराशें वर्षे लागलीं. जगन्निर्मितीबाबतच्या ज्यूडो-ख्रिश्चन कल्पनेनें पाश्चिमात्य जगावर इतका परिणाम केला होता कीं, डार्विननें आपली उत्क्रान्तीची कल्पना-उत्क्रांतीची उत्पत्ति मांडली तेव्हां तो सृष्टिनिर्मात्या ईश्वराचा खून करीत असल्यासारखा भासला. लोकाना तो खुनी वाटला. मनुष्याच्या अमर आत्म्याच्या मनोहर कथेचा डार्विन जणूं वध करीत होता ! तें मधुर काव्य तो मातीस मिळवीत होता ! प्रत्येक जण आपला तिरस्कार करील हें डार्विननें अपेक्षिलेंच होतें. हार्वर्ड येथील स्नेही प्रोफेसर असाग्रे यांना लिहिलेल्या पत्रांत डार्विन म्हणतो, ''मला तुम्हांस प्रामाणिकपणें सांगावेंसें वाटतें कीं, रूढ कल्पनेहून वेगळया निर्णयाप्रत मी आलों आहें. निरनिराळे प्राणी अलग अलग निर्माण करण्यांत आलेले नसून ते सारे परस्परावलंबी आहेत. ....... हें वाचून तुम्ही माझा तिरस्कार कराल हें तर खरेंच; पण मी तुमच्यापासून माझा निर्णय लपवीन तर मी प्रामाणिक कसा राहूं शकेन ?'' त्याच्या प्रतिभेनें व बुध्दीनें लावलेला शोध सर्व जगाला ज्ञात करून देईतों त्याचा प्रामाणिकपणा त्याला स्वस्थ बसू देईना.

`Origin of Species' हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी वीस वर्षे म्हणजे १८३९ सालींच त्यानें उत्क्रांतीची चालचलाऊ उत्पत्ति लोकांपुढें मांडली होती. त्या रूपरेषेचा विस्तार करून १८४२ सालीं त्यानें पस्तीस पृष्ठांचा निबंध लिहिला व तोच पुढें वाढवून १८४४ सालीं २३० पृष्ठांचा केला. हा सर्व काल व पुढील पंधरा वर्षे ही मीमांसा पारखून व पडताळून पाहण्यांत व तिच्यांतील दोष काढून टाकण्यांत खर्चून जे नवे निर्णय निघाले त्यांचें तो पुन: पुन: पर्यालोचन करीत होता. डार्विन स्वत:च स्वत:चा निर्भीड टीकाकार असल्यामुळें विरोधकांचे आक्षेप आधींच कल्पून त्यांना बिनतोड उत्तरें देण्यास तयार होता.

१८५८ सालीं डार्विन आपल्या संशोधनाला शेवटचें स्वरूप देत असतां अकस्मात् एके दिवशीं त्याला दिसून आलें कीं, दुसर्‍या एका शास्त्रज्ञानें नकळत आपली सारी विद्युत् चोरून घेतली. जूनच्या अठराव्या तारखेंस त्याचा मित्र आल्फ्रेड रसेलं वॅलेस यानें उत्क्रांतीवरचा एक स्वतंत्र लेख डार्विनकडे पाठविला व 'मीं मांडलेल्या उत्पत्तीवरील तुमचें प्रामाणिक मत कळवा, तीवर मनमोकळी टीका करा' असें त्याला कळविलें. वॅलेस अमेरिकेंत होता. डार्विन वीस वर्षे प्राण्यांच्या उत्पत्तीचें संशोधन करीत होता हें त्याला माहीत नव्हतें; त्यामुळें 'उत्क्रांतीच्या उत्पत्तीचा संशोधक' म्हणून जगाला आपली ओळख करून देण्याबद्दल त्यानें डार्विनला विनंती केली. अशा परिस्थितींत डार्विननें काय करावें ? त्या विषयावरील आपल्या संशोधनाच्या व लिखाणाच्या अगदीं बरहुकूम वॅलेसचें संशोधन, तसेंच लिखाणहि होतें, हें पाहून सुप्रसिध्द भगर्भशास्त्रवेत्ता डॉ० लायल यास डार्विननें लिहिलें, ''असा योगायोग मी कधींच पाहिला नाहीं. किती आश्चर्यकारक योगायोग ! १८४२ सालीं मीं लिहिलें हस्तलिखित वॅलेसजवळ असतें तर याहून अधिक संक्षिप्त सारांश त्याला काढतां येणें अशक्य होतें.''  एकदां तर सारें श्रेय वॅलेसलाच द्यावें असें त्याला वाटलें. ''क्षुद्र वृत्तीनें मी वागलों अशी शंकाहि कोणास येऊं नये म्हणून माझीं सर्व हस्तलिखितें जाळून टाकावीसें मला वाटतें''  असें त्यानें लायलला लिहिलें. त्यावर लायलनें उत्तर दिलें, ''तुम्ही आपले सर्व विचार ताबडतोब प्रसिध्द करा. स्वत:च्या बाबतींत अन्याय नका करून घेऊं. आपल्याआधीं वीस वर्षे डार्विननें ही उत्पत्ति अजमावली होती हें ऐकून वॅलेसला वाईट न वाटतां आनंदच होईल.''  शेवटीं लिनयिन सोसायटीसमोर आपलें व वॅलेसचें संयुक्त संशोधन म्हणून ही उत्पत्ति मांडण्याचें त्यानें ठरविलें. तथापि उदाहरपणांत आपणहि मागें नाहीं हें ''ज्या उत्पत्तीचें संपूर्ण श्रेय वस्तुत: डार्विनचें आहे तिच्या श्रेयांत मलाहि भाग मिळावा हें माझें केवढें सुदैव !'' असें जाहीर करून वॅलेसनें दाखविलें ! अशा रीतीनें ही सुप्रसिध्द चर्चा थांबली. प्रत्येकानें आपल्या कीर्तीचा प्रश्न बाजूस सारून दुसर्‍याचें नांव मोठें व्हावें म्हणून मोठें मन दाखविलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel