ग्रीस देशावरील डरायसची स्वारी, माराथॉनची लढाई, झर्सिसची दहा लाख सैन्य बरोबर घेऊन आलेली टोळधाड, थॅर्मापिली येथील लिओनिदास याचा शौर्यधैर्यात्मक प्रतिकार, त्या खिंडींतील त्यानें मांडलेलें अभंग ठाण, सालमिसच्या सामुद्रधुनीमध्यें थेमिस्टाक्लिसनें लढविलेले डावपेंच, प्लाटिआ येथील लढाईंत पर्शियनांचा झालेला पराभव, इत्यादि गोष्टी इतक्यांदां सर्वत्र सांगितल्या गेल्या आहेत, कीं त्या पुन्हा सांगण्यांत फारसें स्वारस्य नाहीं. लष्करी डावपेंचांची ज्यांना आवड आहे, आपल्या मानवबंधूंना मारण्यासाठीं लष्करी हालचाली कशा कराव्या, शत्रूंस कसें कोंडीत धरावें हें समजून घेण्याची ज्यांना आवड आहे, माणसें मारण्याची सुंदर कला ज्यांना शिकायची आहे, त्यांनीं समर-चमत्कारांचे ते रक्ताळ व क्रूर इतिहास वाचावे. कोणत्याहि ग्रीस देशाच्या इतिहासांत या गोष्टींचीं इत्थंभूत वर्णनें आढळतील. एक गोष्ट समजली म्हणजे पुरे, कीं या युध्दांत अखेरीस ग्रीकांनीं इराण्यांचा पूर्ण पाडाव केला.
पूर्वेकडून आलेलें तें प्राणघातकी संकट नष्ट केल्यावर पुन्हा ग्रीक लोक आपापसांत कुरबुरी करूं लागले. लहान शहरें अथेन्सचा द्वेष करीत, अथेन्स स्पार्टाला पाण्यांत पाही आणि स्पार्टा सर्वांचाच हेवादावा करी. पर्शियनांनीं जर कदाचित् पुढें पुन्हा हल्ला केला तर त्यांना नीट तोंड देतां यावें म्हणून सर्व ग्रीक नगरराज्यांनीं एक संरक्षणसमिती नेमली होती. या समितीचें प्रमुखपण अथेन्सकडे होतें. या संरक्षणसमितीचें काम नीट चालावें म्हणून प्रत्येक नगरराज्यानें आरमारी गलबतें तरी द्यावीं किंवा पैसा तरी पुरवावा असें ठरलें होतें. येणारा सारा पैसा डेलॉस येथील अॅपॉलोच्या मंदीरांत ठेव म्हणून ठेवण्यांत येई. डेलॉस हें इजियन समुद्रांतील एक बेट होतें. या संरक्षणसमितीला डेलॉससंघ असेंहि संबोधिलें जाई.
जसजसे दिवस जाऊं लागले तसतसें संरक्षण-समितीच्या कामांत मंदत्व येऊं लागलें. कोणी फारसें लक्ष देईना, कोणी आरमारी गलबतें पाठवीना, तर कोणी पैसे देईना. अथीनियन हे प्रमुख असल्यामुळें जमलेल्या पैशांतून ते स्वत:साठींच गलबतें बांधूं लागले. तोंडानें अर्थात् ते म्हणत, कीं या आरमाराचा उपयोग सर्व ग्रीस देशाच्या रक्षणार्थच होईल. जमा झालेल्या पैशाचा अधिकच मुक्तहस्तें उपयोग करतां यावा म्हणून डेलॉस येथील तिजोरी आतां त्यांनी अथेन्स येथेंच आणिली आणि अशा रीतीनें अथेन्स जणूं साम्राज्यच बनलें. इतर नगरराज्यें म्हणजे जणूं खंडणी देणारीं मांडलिक सामंत राज्यें ! इतर ग्रीक लोक अथेन्सची जणूं प्रजा ! इतर नगरराज्यांच्या हक्कांची पायमल्ली करून अथेन्स सर्वसत्ताधीश साम्राज्यवादी होऊं पहात होतें आणि त्यामुळें सर्व ग्रीस देशांत असंतोष पसरला.
कांही सभासद-नगरराज्यांनीं आतां उघडपणेंच पैसा देण्याचें नाकारलें. परंतु अथेन्सनें त्यांच्याविरुध्द आपलें आरमार पाठविलें आणि त्यांना शरण आणिलें. अशा रीतीनें स्वेच्छेनें दिलेल्या किंवा सक्तिनें उकळलेल्या वार्षिक पैशांची जवळजवळ वीस लक्ष रुपये रक्कम जमा होई. त्या काळांत वीस लक्ष रुपये म्हणजे लहान रक्कम नव्हती. या पैशाचा अथेन्सनें फार चांगला उपयोग केला. जगांतील नामांकित कलावंतांना अथेन्सनें आमंत्रण दिलें, त्यांना उदार आश्रय दिला. अथेन्स मातीच्या झोंपड्यांचें एक गांव होतें. परंतु आतां तें संगमरवरी पाषाणांचें व सोन्याचांदीचें अमरनगर झालें. मातीचें जणूं महाकाव्य झालें !
हें सारें योजनापूर्वक घडवून आणणारा लोकशाही पक्षाचा लोकप्रिय पुढारी पेरिक्लीस हा होय.