एकाच वेळीं सम्राट् व सामान्य मानव म्हणून तो जगूं इच्छीत होता.  त्यासाठीं त्याची धडपड चालू होती.  पण त्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहींत.  त्यामुळें त्याच्या जीवनांतील आनंद गेला व त्याच्या जागीं निराशा आली.  तो जगाविषयीं व एकंदर जीवनाच्या मूल्याविषयीं तिरस्करानें बोलूं लागला, कशांतच कांहीं अर्थ नाहीं असें म्हणूं लागला.  उमर खय्याम किंवा कोहेलेथे याप्रमाणेंच कित्येक शतकांपूर्वी बोलतांना तोहि आपणांस दिसतो.  तो लिहितो-''ही दुनिया म्हणजे केवळ वाफ आहे.  हा संसार नि:सार आहे.  येथें सदैव झगडे व मारामार्‍याच आढळणार.  आपण या जगांत क्षणाचे पाहुणे आहों.  मरणोत्तर कीर्ति !  पण तिचें आपणांस काय होय ? क्षणभर कीर्ति मिळते ; पुन: सारे विसरूनहि जातात.  या मानवी जीवनांत का काळ म्हणजे एक क्षण, एक बिंदु.  सारें क्षणिक आहे, चंचल आहे, बदलतें आहे.  आपली प्रजाहि दुबळी आहे.  अंतर्दृष्टि फार मंद असते.  वस्तूंचें अन्तरंग कळत नाहीं.  हें शरीर तर सडणारें आहे.  आत्मा म्हणजे वायूची एक क्षणिक झुळूक !  दैवांत काय असतें हें कळत नाहीं, कीर्ति मिळते तींतहि कांही अर्थ नसतो.  लोक विचार न करतांच टाळ्या वाजवितात, स्तुति करतात.  आणि आपण मेल्यावर स्मरण कशाचें करावयाचें ? पोकळ, शून्य वस्तु, तिचें ?''

हें सारें जीवन बाह्य अवडंबर आहे.  हे सारेच क्षणिक देखावे, बुडबुडे आहेत.  मार्कस ऑरेलियस, त्याचें वैभव, त्याच्या महत्त्वाकांक्षा, त्याची युध्दें त्याचे विजय, त्याचें यश, सारें सारें पोकळ व नि:सार आहे.  अनंत बुडबुड्यांतले हेहि बुडबुडे !

पण त्याचें स्टोइक वळण त्याला धीर देई. आपल्या नशिबीं आलेलें पोकळ राजवैभव तो सहन करी.  ''जें वांट्यास आलेलें आहे.  तें दैवानें दिलेलें आहे.  तें अपरिहार्य आहे.  तें सहन करा.'' असें स्टोइक तत्त्वज्ञान सांगतें.  आपण देवाच्या हातांतलीं बाहुलीं आहों,  आपलें जीवन त्याच्या इच्छेसाठीं आहे, आपल्या मन:पूर्तीसाठीं नाहीं.  तो लिहितो, ''माझें काय व्हावें, माझ्या नशिबीं काय यावें याचा विचार देवांनीं केलाच असेल व तोच योग्य असणार.  त्यांनीं खास माझ्या बाबतींत जरी विचार केला नसेल तरी या विश्वाच्या सर्वसाधारण कल्याणाची चिंता त्यांनीं केलीच असेल.  यासाठीं या विश्वसंसारांत जें माझ्या नशिबीं येईल तें विश्वयोजनेनुसार आहे असें समजून मीं आनंदानें सहन केलेंच पाहिजे,  त्यातच समाधान मानलें पाहिजे.  माझ्या बाबतींत जें जें घडत आहे तें तें अनंत काळापासून तसें योजिलेलेंच आहे.''  आपल्या आत्म्याच्या खिन्न आदर्शांत बघून मार्कस स्वत:ची पुढीलप्रमाणें कानउघाडणी करतो : ''घाबरूं नको.  नशिबानें जें ताट वाढून ठेविलें आहे तें गोड करून घे.  जें दैवानें दिलें आहे त्याच्याशीं जमवून घे.  दैवाला तुझ्यां जीवनाचें वस्त्र जसें विणावयाचें असेल तसें विणूं दे.  तेंच तूं अंगावर घे.  देवांना चांगलें कळतें, अधिक कळतें, सर्वांत जास्त समजतें.''

पण त्याच्या तत्त्वज्ञानानें त्याचें समाधान झालें नाहीं.  त्याच्या जीवनांत खोल निराशा होती.  त्याची महत्त्वाकांक्षा शेवटपर्यंत अपुरीच राहिली.  त्याला हवें होतें शांति-समाधान, पण मिळाला पोकळ मोठेपणा ! त्याला वैभव लाभलें, शांति-लाभ झाला नाहीं.  आपल्या अप्राप्त ध्येयाकडे तो एकाद्या भणंग भिकार्‍याप्रमाणें पाहत राही व अर्धवट धार्मिक अशा शब्दजंजाळांत—शाब्दिक धुक्यांत—तो आपलें ध्येय अदृश्य करून टाकी.  त्या अर्धवट धार्मिक शब्दांवर तरी त्याचा पूर्ण भंरवसा कोठें होता ?

- ४ -

इ. स. १८० चा हिंवाळा आला.  मार्कस एकुणसाठ वर्षाचा झाला होता.  उत्तरेस जर्मनांशीं लढतांना त्या कडक थंडींत त्याची प्रकृति बिघडली, त्याचें सारें शरीर जणूं गोठलें, गारठून गेलें ! घरीं रोमकडे परतण्यापूर्वीच तो मेला. 

त्याची कारकीर्द अयशस्वी झाली.  त्याचें जीवन अपेशी होतें ; तें पाहून फार वाईट वाटतें.  त्याच्या मनांत असलेल्या उदात्ततेनुसार तो वागता तर तो महापुरुष झाला असता.  पण अखेर तो कोण झाला ?  धंदेवाईक सैनिकांच्या शहरांतला एक विजयी सेनापति, इतक्याच नात्यानें तो शिल्लक राहिला.  त्यानें मिळविलेल्या विजयांतूनच पुढच्या युध्दाचें बीजारोपण झालें व त्यांतच शेवटीं रोमचा नाश झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel