''सॉक्रे़टिसावर असा गुन्हा केल्याचा आरोप आहे कीं, ज्या देवदेवतांची हे शहर पूजा करतें त्या देवदेवतांची पूजा तो करीत नाहीं, एवढेंच नव्हे तर आपल्या कल्पनेप्रमाणें नवीनच देवदेवता निर्मीत आहे, प्रचारांत आणीत आहे.  दुसरी गोष्ट म्हणजे तरुणांना तो बिघडवीत आहे.  या अपराधास शिक्षा म्हणजे मरण.''

ज्या सरकारी धर्ममार्तंडांनीं—धर्मरक्षण करणार्‍या ज्या सरकारी कुत्र्यांनीं-सॉक्रे़टिसावर हा आरोप लादला होता, त्याचा सॉक्रे़टिसावर वैयक्तिक दात होता ; म्हणून त्याच्या रक्तासाठीं ते तहानले होते.  आरोप करणार्‍या अधिकार्‍यांपैकीं एकाचें नांव अ‍ॅनिटस असें होतें.  सॉक्रे़टिसानें त्याच्या मुलाला बिघडवलें होतें.  बापाबरोबर धंद्यांत शिरूं नको असें सॉक्रे़टिसानें त्याला सांगितले होतें.  अ‍ॅनिटस हा कातड्याचा व्यापारी होता.  त्याचा मोठा भरभराटलेला धंदा होता.  आपल्या कौटुंबिक कारभारांत सॉक्रे़टिसानें ढवळाढवळ करावी याचा त्याला राग आला.  कातड्याच्या धंद्यांत आपल्या मुलाचें सहकार्य आपणांस मिळावें म्हणून सॉक्रे़टिसास ठार करण्याचें त्यानें ठरविलें.

ज्या ज्यूरीसमोर सॉक्रे़टीस उभा होता, तिच्यांतील लोक नि:पक्षपाती व न्यायी निर्णय देतील असें चिन्ह नव्हतें.  तशा मन:स्थितींत ते ज्यूरर्स नव्हते.  नुकतेंच एक दीर्घकालीन युध्द संपलें होतें.  क्रान्ति, प्रतिकान्ति वगैरे प्रकार होऊन गेले होते.  यामुळें अ‍ॅथीनियन लोकांचा विवेक, समतोलपणा नष्ट झाला होता.  तरीहि सॉक्रे़टिसानें बचावाची नीट तयारी केली असती तर तो सुटता.  परंतु जाणूनबुजून त्यानें तसें करण्याचें नाकारलें.  तो आतां जवळजवळ सत्तर वर्षाचा झाला होता.  तो म्हणाला, ''सत्तर वर्षे जगलों.  पुष्कळ नाहीं का झालें ?  पुरे कीं आतां.'' तो पुन्हां म्हणाला, ''मनाच्या व बुध्दीच्या सर्व शक्ति शाबूत, अविकृत असतांच मरण येणें बरें नाहीं का ?  पुढें आणखीं म्हातारें होणें व दुसरें बाल्य अनुभविणें, इंद्रियांच्या सर्व शक्ति नष्ट झाल्यावर जगणें, यापेक्षां निरोगी मरण बरें.''

त्यानें जें भाषण केलें त्यांत बचावासाठीं म्हणून तो बोलला नाहीं.  स्वत:चे प्राण वांचावें म्हणून त्यानें तें भाषण केलें नव्हतें.  त्यानें आपलें तत्त्वज्ञानच त्या भाषणांत पुन्हां नीट मांडलें.  तो म्हणाला, ''मी रडेन, प्राणांची भीक मागेन, तुमच्या पायां पडेन अशी अपेक्षा तुम्हीं कदाचित् केली असेल.  माझ्या मुलांबाळांनीं, आप्तेष्टांनीं, तुमच्यासमोर येऊन माझ्यासाठीं पदर पसरावा असें कदाचित् तुम्ही अपेक्षीत असाल.  परंतु मी अशी प्रार्थना करीन तर मीं गुन्हा मान्य केला असें नाहीं का होणार ?  माझें कर्तव्य एकच आहे : तुम्हालांहि खरे ज्ञान देणें, तुम्हांला शिकविणें, तुमचें मतपरिवर्तन झालें तर बघणें.''  ज्ञानसंशोधनासाठी त्यानें आयुष्य वेचलें.  शहाणपणा, सत्य विचार यांसाठीं सारें जीवन अर्पिण्याचा त्याचा कृतनिश्चय होता.  हेंच त्याचें जीवनध्येय होतें.  तो स्वत:चें व दुसर्‍याचें परीक्षण करी, पृथक्करण करी.  खरें काय तें शोधूं पाही.  जरी मृत्यूच्या छायेंत तो उभा होता, जरी त्याच्यासमोर मरण उभें होतें, तरी त्या क्षणींहि स्वत:वर आरोप लादणार्‍यांस तो शिकवूं इच्छीत होता.  त्यांनीं आपणांवर दया करावी म्हणून तो तेथें बोलूं इच्छीत नव्हता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel