प्लेटोनें तत्त्वज्ञानमंदिर उघडलें. त्या ज्ञानमंदिरांत बसून आपल्या विद्यार्थ्यांशीं तो जीवनमरणाच्या प्रश्नांवर चर्चा करी, मानवी जीवनाच्या भवितव्याविषयीं बोले. फावल्या वेळीं तो लिही. ज्या जगानें सॉक्रे़टिसास मरणाची शिक्षा दिली, त्या जगाला प्लेटो विटला होता. तो मनामध्यें अधिक निर्दोष जगाची स्वप्नें खेळवीत बसे. तें आपलें आदर्श जग, तें आपलें पूर्णतेचें स्वप्न, त्यानें त्या जगद्विख्यात संवादांच्या रूपानें जगासमोर मांडलें आहे. ते नाट्यरूप संवाद अमर आहेत, अद्वितीय आहेत. त्या संवादांत सॉक्रे़टीस हें प्रमुख पात्र आहे. परंतु सॉक्रे़टिसाच्या तोंडी घातलेले विचार मात्र सॉक्रे़टिसाचे नसून प्लेटोचे आहेत. प्लेटोचें स्वप्न सॉक्रे़टीस बोलून दाखवीत आहे. आवाज सॉक्रे़टिसाचा आहे, परंतु विचार प्लेटोचे आहेत.
सॉक्रे़टिसानें स्वर्गातील तत्त्वज्ञान भूतलावर आणलें असें म्हणतात. प्लेटोनें तें तत्त्वज्ञान पुन्हां वर स्वर्गांत नेलें. किंवा असें म्हणूं या कीं, पृथ्वीच स्वर्गाची प्रतिमा व्हावी म्हणून या पृथ्वीचीच पुनर्रचना करण्याचा त्यानें प्रयत्न केला. तो लिहितो. ''ही पृथ्वी म्हणजे एक खोल अंधारी गुहा आहे. बुध्दीचा व ज्ञानाचा प्रकाश तेथें पोंचूं शकत नाहीं ; आपण या गुहेंत शृंखलाबध्द करून ठेवलेले कैदी आहों. जे पदार्थ आपण येथें पाहतों ते सत्यतेच्या छाया आहेत. आपल्या डोळ्यांसमोर सद्वस्तूंच्या या छाया काळ्या अंधार्या भिंतीवर क्षणभर नाचतात व नाहींशा होतात. सत्यमय जगत्, परिपूर्ण जगत् कल्पनेंत आहे. वस्तूंचें सद्रूप, वस्तूंचें अंतिम, परिपूर्ण स्वरूप, तेथें वर, स्वर्गात आहे. ज्या जगांत आपण जगतों तें त्या सद्रुप व परिपूर्ण सृष्टीचें अपूर्ण असें प्रतिबिंब आहे.'' मूसाप्रमाणें प्लेटोहि स्वत:मधील दिव्यतेचेंच अनंतपटीनें वाढविलेलें स्वरूप म्हणजे परमेश्वर असें मानतो. स्वत:मधील ज्ञान व साधुता, शिवता व सुंदरता यांचें परिपूर्ण रूप म्हणजेच प्लेटोचा परमेश्वर. प्लेटो ज्याप्रमाणें आपल्या तत्त्वज्ञानाच्या उद्यानांत बसे, त्याप्रमाणें त्याचा तो परमेश्वरहि स्वर्गांतील त्या परिपूर्ण अशा 'परमधामां'त असतो. प्लेटो ज्याप्रमाणें आपल्या उपवनांत बसून सुंदर जगाच्या परिपूर्ण कल्पनेचा विचार करीत बसे, जवळ असलेल्या अपूर्ण व सदोष वस्तुजातांतून त्या आदर्श जगाची प्रतिकृति करूं बघे, तद्वतच तो परमेश्वरहि जणूं वरतीं करीत असतो. दगडांधोंड्यांतून, कांट्यांकुट्यांतून परमेश्वर स्वर्ग निर्मू पाहत होता ; परंतु स्वर्गाचें ध्येय दूर राहून ही पृथ्वी मात्र त्यानें निर्मिली. मातींतून देवदूत निर्माण करण्याच्या ध्येयानें प्रभु काम करूं लागला ; परंतु देवदूताऐवजीं त्याच्या हातून हा मानवच घडला.
परंतु प्लेटोच्या अध्यात्मांत रमायला आपणांस अवसर नाहीं व त्याची जरुरीहि नाहीं. त्याला स्वत:लाच त्या बाबतींत नि:शंकता नव्हती. तो धुक्यांतच वावरत असे. सारे अध्यात्मवादी एक प्रकारच्या संदिग्धतेंत, अस्पष्टतेंतच, वावरत असतात. सौंदर्याची कल्पना व परमेश्वर यांचा संबंध काय ? आदर्शभूत सौंदर्य व ईश्वर एकरूपच का ? जो स्वर्गीय विश्वकर्मा सौंदर्याची कल्पना मानवांच्या रूपानें आविर्भूत करूं पाहतो, त्या विश्वकर्म्याचें व त्या ध्येयभूत सुंदरतेचें नातें काय ? ती निर्दोष सौंदर्याची कल्पना ईश्वराचाच एक भाग का ? ती ध्येयभूत सौंदर्यवस्तु म्हणजे का प्रभूच्या हातांतील योजना, त्याच्यासमोर असणारा नकाशा ? का ही सौंदर्यवस्तु ईश्वराहून स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे ? ईश्वरातीत आहे ? ईश्वराच्या बाहेर आहे ? जर ही आदर्शभूत सौंदर्याची कल्पना ईश्वरनिरपेक्ष व ईश्वराहून स्वतंत्र अशी निराळी असेल तर त्या कल्पनेचे विशिष्ट गुणधर्म काय ?