भाग तिसरा
मध्ययुगांतील रानटीपणा
प्रकरण १ लें

शार्लमन : पोपला वांचवून स्वतः सम्राट् होणारा

- १ -

महंमदाच्या मरणानंतर पुष्कळशा शतकांनंतर हें जग मुसलमान व ख्रिश्चन याच्यामधील युध्दभूमि झालें.  मशीद व चर्च यांमध्यें लाजिरवाणी स्पर्धा सुरू झाली होती.  शरिरें मारून मानवी मनाचा ताबा कोणीं घ्यावयाचा याबाबत या दोघांमध्यें शर्यत लागली होती.  वास्तविक पाहतां खरा मुसलमान ईश्वरशरण असतो, खरा ख्रिश्चन शांतीचें उपनिषद् मानतो.  पण अनुयायी मिळविण्याच्या स्पर्धेत दोघांनाहि आपापल्या सत्यधर्माचा विसर पडला.  या दोन्ही धर्मांस उगाच नांवें ठेवावयाचीं अशांतला भाग नाहीं.  नेहमींच तरवारीनें धर्म लादला गेला असें नाहीं.  किती तरी मुसलमान व ख्रिश्चन असे होते कीं, त्यांनीं आपल्या उदार व उदात्त वर्तनानें परधर्मीयांमध्यें ईश्वरशरणागतीचा सुंदर मुस्लिम धर्म व प्रेमाचा ख्रिश्चन धर्म यांचा प्रसार केला.  पण त्या त्या धर्मानुयायांचे पुढारी महत्त्वाकांक्षी असत, त्यांना कशाचीहि दिक्कत नसे.  धर्माच्या मिषानें, धर्माच्या बुरख्याखालीं व ईश्वराच्या नांवानें ते स्वार्थ साधूं पाहत.  महंमदानंतर जे मुस्लिमांचे खलिफा झाले त्यांनीं मुस्लिम धर्म व मुस्लिम सत्ता रक्तानें सर्वत्र चालू करण्याचें व्रत उचललें.  अफ्रिकेचा उत्तर भाग व युरोपांतील स्पेन देश वगैरेंकडे हातीं तरवार घेऊन ते दयाळू अल्लाचें भीषण वैभव पसरवीत चालले.  ख्रिश्चन धर्मीय राजांनींहि प्रेमसिंधु येशूचा धर्म पश्चिम युरोपभर रक्तानें शिकविला.  मुसलमान आपला धर्म वर उत्तर फ्रान्समध्यें नेऊं लागतांच खालीं स्पेनमध्यें येणार्‍या ख्रिश्चनांशीं त्यांची झटापट झाली.  महंमदाच्या मरणानंतर बरोबर शंभर वर्षांनीं टूर्स येथें झालेल्या मोठ्या लढाईंत शार्लमनचा आजा चार्लस मार्टेल (मार्टेल = घाव घालणारा) याच्या सेनापतित्वाखालीं लढणार्‍या ख्रिश्चनांचा विजय झाला.

- २ -

चार्लस मार्टेल हा फ्रान्सच्या राजाचा मुख्य प्रधान होता.  त्या वेळचे फ्रेंच लोक आजच्या फ्रान्समध्यें व जर्मनीमध्यें राहत होते ; फ्रान्सांत राहणारे ज्या भाषेंतून पुढें आजची फ्रेंच भाषा बनली ती भाषा बोलत व जर्मनींत राहणारे फ्रेंच ज्या भाषेंतून पुढें आजची जर्मन भाषा बनली ती टिओटिक म्हणजे जनतेची भाषा बोलत.  अशा रीतीनें भाषात फरक होते तरी प्रारंभी फ्रेंच व जर्मन एकच होत; दोघांचा राजाहि एकच होता.  चार्लस मार्टेलच्या वेळीं राजा केवळ नामधारी होता.  मुख्य प्रधानच सर्वसत्ताधीश अनभिषिक्त हुकुमशहा होता.

टूर्स येथें फ्रँकांनीं मुसलमानांचा पराजय केला त्याचें श्रेय राजाकडे न जातां चार्लस मार्टेल यालाच मिळालें. 'ख्रिश्चन धर्माचा त्राता', 'ख्रिस्ताचें नांव राखणारा', म्हणून त्याचा गौरव करण्यांत आला.  इटलींतील लंबार्डियन लोक ख्रिश्चन शिकवण मानीत नव्हते, म्हणून त्यांच्यावर स्वारी करण्यासाठीं पोपनें मार्टेलला गौरवपूर्वक बोलावलें ; पण पोपला साह्य करण्यापूर्वीच मार्टेल मरण पावल्यामुळें तें काम 'ठेंगणा पेपिन' नांवाच्या त्याच्या मुलाला पडलें.  तो फ्रँकाच्या राजाचा मुख्य मंत्री होता ;  पण मुख्य प्रधानकीवर त्याला समाधान नव्हतें ; राजा होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती.  इटलींत जाण्यापूर्वी ''ज्याच्या हातीं खरोखर खरी राजसत्ता आहे, त्यानेंच राजा कां होऊं नये ?'' असा मोठा मुत्सद्देगिरीचा व सूचक प्रश्न त्यानें पोपला केला.  पोपनें होकारार्थी उत्तर पाठवून फ्रँकांचा राजा ''चाइल्डेरिक'' याला भिक्षु होण्यास सांगितलें व पेपिनला ''ईश्वराच्या कृपेनें झालेला फ्रँकांचा राजा'' म्हणून गादीवर बसविलें.  पोपच्या या उपकाराची परतफेड म्हणून पेपिननें इटलीवर स्वारी केली व लंबार्डीतील लोकांना जिंकून त्यांचीं अनेक शहरें पोपला भेट म्हणून दिली.

'पेपिनची देणगी' या नांवानें ही भेट प्रसिध्द असून हिच्या योगानेंच चर्चच्या ऐहिक वैभवाचा, पृथ्वीवरील सत्तेचा प्रारंभ झाला.  यापूर्वी पोप केवळ काल्पनिक अशा स्वर्गातील राज्यांतच दंग असत ; पण यानंतर ते पृथ्वीवरच्या खर्‍याखुर्‍या धनदौलतींत रस घेऊं लागले.  चर्चचें व स्टेटचें लग्न लागलें.  पेपिनच्या देणगीपासून सुमारें हजार वर्षे चर्चनें जगावर प्रभावी वर्चस्व गाजविलें व तें बह्वंशीं शापप्रद व दु:खदायकच होतें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel