म्हणून शुहलिंगनें पुन्हा लग्न करण्याचें ठरविलें.  त्याचें वय सत्तराहून अधिक होतें.  नऊ मुलांची माता/ती पहिली पत्नी-त्यानें दूर केली आणि एका लहान मुलीबरोबर त्यानें लग्न केलें.  चीनमध्यें पत्नीला पुत्र होत नाहीं ही सबब काडीमोडीसाठीं पुरे होई आणि हें जें अप्रस्तुत व असमान असें विषम लग्न लागलें, त्याचे फळ म्हणून पूर्वेकडील अत्यंत शहाणा मनुष्य जन्माला आला.  ख्रि.पू. ५५१ मध्यें कन्फ्यूशियस जन्मला.

वयाच्या तिसर्‍या वर्षी कन्फ्यूशियस पितृहीन झाला.  कन्फ्यूशियस अति बुध्दिमान् होता.  लहान वयांतच त्याची अलौकिक बुध्दि दिसूं लागली.  त्याच्या त्या निरोगी व धष्टपुष्ट शरीरांत अत्यंत प्रभावी असें मन होतें ; अति प्रभावशाली बुध्दि होती.  तो व्यायामाचा फार भोक्ता होता.  परंतु त्यापेक्षांहि काव्याचा व संगीताचा अधिक भक्त होता.  भराभरा त्यानें सारें ज्ञान आत्मसात् केलें.  वयाच्या पंधराव्या वर्षीच त्याचे गुरुजन त्याला म्हणाले, ''तुला शिकवायला आतां आमच्याजवळ कांहीं उरलें नाहीं.''

पुढें दोन वर्षांनीं त्याला अकस्मात् स्वत:चा अभ्यास सोडावा लागला.  त्याची आई गरीब होती.  तिला त्याची मदत हवी होती.  आईला आधार देणें त्याचें कर्तव्य होतें.  आपल्या देशाच्या लहान राज्यांतील शेतीखात्यांत तो कारकून झाला.  सतरा वर्षांच्या मुलाला ती जागा झेंपायला जरा कठिणच होती.  परंतु कन्फ्यूशियसनें कुरकुर केली नाहीं.  वास्तविक स्वत:चा जेवढा बोजा, त्याहूनहि तो अधिक उचली.  त्याला जणूं ती सवयच होती.  कारकुनी डोक्यावर असतांनाच लग्न करून त्यानें बायकोचा आणखी बोजा उचलला.  लग्नाच्या वेळेस त्याचें वय केवळ एकोणीस वर्षाचें होतें.  एका वर्षानें त्याला पहिला मुलगा झाला.  त्याचें हें लग्न सुखप्रद झालें नाहीं.  कां तें कळत नाहीं.  कदाचित् त्याच्या पत्नीला सुंदर सुभाषितापेक्षां अधिक रुचकर व स्वादिष्ट अशा अन्नाची जरुरी असावी.  कन्फ्यूशियस आपल्या शिष्यांना उपदेशाचें, सुंदर सूत्रमय वचनांचें खाद्य देई.  परंतु पत्नी त्या शब्दांनीं थोडीच संतुष्ट होणार ! तिला प्रत्यक्ष पोटभर अन्न हवें होतें.

चोविसाव्या वर्षी त्याची आई त्याला सोडून गेली.  सनातनी चिनी रुढीप्रमाणें मातृशोकप्रदर्शनार्थ त्यानें नोकरी सोडली.  मातृशोकप्रदर्शनाची मुदत अडीच वर्षांची असे.  कन्फ्यूशियसनें ती अक्षरश पाळली.  कन्फ्यूशियस आपल्या देशाचे सारे रीतरिवाज पाळण्यांत अत्यंत दक्ष असे.

कन्फ्यूशियस जरी तरुण होता, वयानें अद्याप फारसा मोठा नव्हता, तरी स्वत:च्या मित्रमंडळांत सौम्य व शांत स्वभावाचा, तसेंच अति बुध्दिमान् म्हणून त्याची ख्याति झाली.  त्याची बुध्दि खरोखरच तेजस्वी होती.  त्याचें मन प्रगल्भ होतें.  मित्रांनीं आग्रह केल्यावरून तो फिरता आचार्य झाला, परिव्राजक, उपदेशक झाला.  तो जेथें जेथें जाई तेथें तेथें निष्ठावंत शिष्याचा मेळावा त्याच्याभोंवतीं जमे.  एका बैलगाडींत बसून तो या गांवाहून त्या गांवीं जात असे.  मधूनमधून विश्रांतीसाठीं तो मुक्काम करी, एकाद्या नदीकांठीं थांबे, शिष्यांना प्रवचन देई.  प्रश्नोत्तरें चालत, चर्चा होई.  कधीं भाताच्या शेताजवळ मुक्काम पडावा. कधीं चेरी झाडांनीं सुगंधित केलेल्या स्थानीं ते थांबत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel