शेवटीं तो पॉप्पिआच्या योजनेंत सामील झाला.  आईबरोबरचें भांडण मिटलें असें त्यानें जाहीर केले व आईला एक हृदयस्पर्शी पत्र लिहिलें व बायी या ठिकाणीं आपल्या भेटीसाठीं बोलाविलें.  तेथें उन्हाळ्यांत राहण्यासाठीं त्यानें ग्रीष्म-प्रासाद बांधला होता.  आग्रिप्पिनाच्या मनातले सारे संशय नाहींसे झाले व ती बायी येथें गेली.  नीरो तिला भेटला.  त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या.  मायलेंकरें भेटलीं, आईनें मुलाला पोटाशीं धरलें, मुलानें आईला मिठी मारली.  नीरोनें आईच्या सन्मानार्थ मोठी मेजवानी दिली व अत्यंत शृंगारलेल्या गलबतांतून तिला पाठविण्याची सिध्दता केली.  त्यानें तें गलबत मुद्दाम तिच्यासाठीं तयार केल्याचें सांगितलें व त्यांतल्या सर्व सुखसोयी तिला दाखविल्या.  पण एक गोष्ट मात्र त्यानें तिला दाखविली नाहीं.  रोमन आरमाराचा अ‍ॅडमिरल अ‍ॅनिसेट्स हा त्या गलबताचा कप्तान होता.  त्याला गलबताच्या तळाशीं कळीचा एक गुप्त दरवाजा करण्यास सांगितलें होतें.  तो योग्य वेळीं कळ दाबतांच उघडून पाणी आंत शिरून गलबत बुडावें अशी योजना करण्यांत आली होती.  सूचनेप्रमाणें कळीचा दरवाजा उघडून पाणी आंत सोडण्यांत आलें ; पण आग्रिप्पिना पट्टीची पोहणारी होती.  तिचे दोन नोकर बुडून मेले.  तिला एका कोळ्यानें वाचविलें. 

आपल्या आईच्या मृत्युवार्तेची दुसरे दिवशीं सकाळी नीरो वाट पाहत होता ; पण ' मी सुरक्षित आहें, सुखरूप आहें.' असा तिचा निरोप आला.  'कोळ्याच्या मदतीमुळें मी वांचल्यें, त्याला धन्यवाद ! ईश्वराची दया.' असें तिनें म्हटलें होतें.  ती आपल्या प्रासादांत आराम करीत होती.

आई जिवंत असल्याचें कळताच घाबरून पुढें काय करावें हें नीरोनें आपल्या दोघां सल्लागारांस विचारलें.  सेनेका व बुर्र्‍हस व त्याचे सर्वांत शहाणे सल्लागार दु:खानें म्हणाले, 'एकदां हें काम हातीं घेतलेच आहे तेव्हां तें पुरें केलें तरच बचाव आहे.' तेव्हां त्यानें आपली आई आपल्या जिवावर उठली असून तिनें आपणास ठार मरण्याचा कट केला आहे असें जाहीर केलें.  पुष्कळसे गुंड बरोबर देऊन त्यानें अ‍ॅनिसेट्स याला पाठविलें.  तो आग्रिप्पिनाच्या राजवाड्यावर चालून गेला.  तिला कोंडून व लाठ्या मारून ठार करण्यांत आलें.

- ४ -

अशा रीतीनें नीरोच्या आईचा प्रश्न सुटतांच पॉप्पिआ राणी ऑक्टेव्हिया हिच्याकडे वळली.  तिनें नीरोमार्गेतिच्याशीं घटस्फोट करण्याबद्दल लकडा लावला.  नीरोनें घटस्फोट केला.  पण नुसती काडीमोड होऊन पॉप्पिआ हिला सुरक्षितता वाटेना.  ऑक्टेव्हिया जिवंत असेपर्यंत भय कायम आहे अशी तिची समजून असल्यामुळें तिनें ऑक्टोव्हियाविरुध्द राजद्रोहाचा खटला उभा केला.  तिला देहान्त शिक्षा झाली.  ऑक्टोव्हिया स्नानगृहांत होती तेथेंच खुनी मारेकर्‍यांनीं तिला गुदमरवून मारलें व मग तिचें शिर कापून तें पॉप्पिआकडे भेट म्हणून पाठविलें.

नीरो व पॉप्पिआ यांचे लग्न झालें ; पण ते अमंगल लग्न मंगलावह व सुखप्रद थोडेंच होणार होतें ? पॉप्पिआ लवकरच माता होणार होती.  ती आसन्नप्रसवा होती.  तिचे दिवस भरत आले होते.  अशा स्थितींत एके दिवशी नीरोनें तिला संतापाच्या भरांत लाथ मारली व ती लवकरच मरण पावली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel