हो.  तें तयार करणें शक्य आहे असें मला वाटतें.  नवीन येशूचें चित्र हवें असेल तर एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे कीं, कितीहि झालें तरी येशू मानव, मर्त्य होता.  त्याचा स्वभाव हळूहळू विकसत गेला.  त्याच्या जीवनांत हळूहळू उत्क्रांति, वाढ होत गेली.  इतर मानवांप्रमाणेंच त्याचेंहि चारित्र्य हळूहळू फुलत गेलें.  नव्या करारांतील कालगणना आपण दूर फेंकून देऊं या.  त्याच्या चरित्रांतल्या ज्या अनेक कथा चार पुस्तकांत आल्या आहेत त्यांनाहि फारसें महत्त्व नाहीं.  त्या तोंडोतोंडी आलेल्या लोककथा आहेत.  मानसशास्त्राचें किंवा इतिहासाचें ज्ञान नसणार्‍यांनीं त्या गोष्टी गोळा करून लिहून काढल्या आहेत.  एकाद्या चिनी कोड्याप्रमाणें हे तुकडे बायबलांत इकडे, तिकडे, चोहोंकडे, सर्वत्र पसरलेले, विखुरलेले आहेत.  ते गोळा करून त्यांची नीट जुळणी करून पुनर्रचना करतां आली तर ज्याचें आकलन करतां येईल, ज्याच्यावर प्रेम करतां येईल, ज्याचें पूजन करतां येईल असा पुरुष आपणांस खास खास निर्मितां येईल, एका मर्त्य व्यक्तिचें सुंदर व सहृदय चित्र खचित उभें करतां येईल.

हा पुरुष कशा प्रकारचा होता ?  प्रारंभीं तो बंडखोर व तापट डोक्याचा होता ; तो प्रतिष्ठितांच्या समाजाचा द्वेष करी ; आपल्यासारखें जे परित्यक्त वा दरिद्री होते त्यांच्यांत तो मिसळे.  भोंवतालचें जीवन पाहून तो असंतुष्ट झाला होता.  अधिक चांगलें जीवन सर्वांना लाभावें म्हणून झगडावयाला, लढा करावयाला तो तयार होता.  त्याचा स्वभाव जहाल व जलाल होता.  तो मारण्यासाठीं हात उगारी, शाप देण्यासाठीं जीभ उचली.  जग सापांनीं व सैतानांनीं भरलेलें आहे असें त्याला वाटे.  जग म्हणजे चोरांचें व लुटारूंचें माहेरघर व दरोडेखोरांची गुहा आहे असें त्याला वाटे.  या सर्वांना शुध्द करणें किंवा हांकलून देणें हें आपलें कर्तव्य आहे, अशी त्याची समजूत होती.  थोडक्यांत म्हणजे अत्युत्कट क्रान्तिकारक जॉन दि बॅप्टिस्ट याचा तो श्रध्दाळू शिष्य होता.

पण तो मानवांवर अपरंपार प्रेम करी म्हणूनच त्यांच्यावर दांतओठहि खाई, त्यांचा द्वेषहि करी.  ज्यू प्रेषितांचा क्रोध व त्यांची करुणा दोन्ही त्याच्या ठायीं होतीं.  प्रथम कांही असंतुष्ट भिकारडे लोकच त्याच्याभोंवतीं गोळा झाले.  पण जसजेस त्याचे अनुयायी वाढूं लागले, त्याचे शिष्य त्याची पूजा करूं लागले, तसतसा त्याच्या स्वभावांतील मधुरतेचा स्तुत्य व उदात्त भाग अधिकाधिक प्रकट होऊं लागला.  तो संयम ठेवूं लागला, क्रोध आवरूं लागला.  त्यानें आपल्या प्रक्षोभशील स्वभावाला माणसाळविलें.  त्याचा मर्त्य स्वभाव हळूहळू दैवी बनूं लागला, मातीचें सोनें होऊं लागलें.  तो असंतुष्ट जनतेचा देव बनला.  आणि नंतर त्याचें मरण ! पण आपण त्याचे चरित्र अधिक जवळ जाऊन पाहूं या व त्याचा स्वभाव निरीक्षूं या.

- ३ -

लहानपणीं तो नेहमी भटके, कधींहि स्वस्थ बसत नसे.  त्याचा स्वभाव बंडखोर होता.  त्याला आईबापांनींजेरुसलेम येथें आणलें तेव्हां तो त्यांना सोडून निघून गेला व ज्यूंच्या धर्ममन्दिरांत जाऊन येथील धर्मगुरुंशीं वाद करीत बसला.  इकडे आईबाप त्याला शोधीत होते.  शेवटीं तो जेव्हां सांपडला तेव्हां त्यांनीं त्याची चांगलीच कानउघाडणी केली.  त्यांनीं त्याला नाना प्रश्न विचारले.  त्यांचीं त्यानें जरा रागानेंच उत्तरें दिलीं.  वडील मंडळींच्या म्हणण्याकडे तो दुर्लक्ष करूं लागला.  वडील मंडळींचें न ऐकण्याची प्रवृत्ति त्याच्या ठायीं दिसून येऊं लागली.  तो आपल्या सद्‍सद्विवेकबुध्दीच्या सांगीप्रमाणें वागूं लागला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel