हा घोडा अर्वाचीन मूर्तिकलेंतील एक आश्चर्य आहे. लुडोव्हिकोचा पिता या घोड्यावर बसलेला काढावयाचा होता. घोड्याचा आकार प्रचंड होता. एकंदर पुतळ्याची ती कल्पनाच अतिशय भव्य होती. इ.स. १४९३ मध्यें या पुतळ्याचा मातीचा नमुना प्रदर्शनार्थ मांडला गेला होता. त्रिकोणी मंडपाखालीं—मेघडंबरीखालीं हा पुतळा ठेवला गेला. मिलन शहराची ती अमरशोभा होती. मिलनमधील तें अपूर्व आश्चर्य होतें. नंतर पितळेचा तसा पुतळा ओतून घ्यावा म्हणून योजना केली गेली; पण ती सिध्दीस गेली नाहीं. कारण, इ.स. १४९९ मध्यें फ्रेंच सैनिकांनीं मिलन घेतलें व हा पुतळा हें त्यांच्या तिरंदाजीचें एक लक्ष्य होतें. बाण मारून पुतळा छिन्नभिन्न केला गेला.

आपल्या या अर्धवट रानटी मानवसमाजांत प्रतिभावान् व प्रज्ञावान् पुरुष जें निर्माण करीत असतात, त्याचा मूर्ख लोक विनाश करितात. मूर्खानीं विध्वंसावें म्हणूनच जणूं शहाण्यांनीं निर्मिलें कीं काय कोण जाणे ! युध्दानें मनुष्याचा देहच नव्हे तर आत्माहि मारला जातो, हा युध्दावरचा सर्वांत मोठा आरोप आहे.

- ३ -

आपण पाहिलें कीं, रणविद्येंतील एंजिनिअर या नात्यानें लिओनार्डोच्या कारकीर्दीस सुरुवात झाली. पण आयुष्याच्या अखेरच्या काळांत तो लष्करशाहीचा कट्टा शत्रु झाला. ''युध्द म्हणजे अत्यंत पाशवी मूर्खपणा व वेडेपणा'' असें तो म्हणतो. पाण्याखालीं राहून लढण्याचें यंत्र पुरें करण्याबद्दल जेव्हां त्याला सांगण्यांत आलें तेव्हां तें नाकारून तो म्हणाला, ''मनुष्याचा स्वभाव फार दुष्ट आहे.''  युध्दांतील सारी पशुता व विद्रूपता यथार्थतेनें पाहणारे जे कांहीं लोक नवयुगांत होते त्यांतील लिओनार्डो हा पहिला होय. त्यानें लढाईचीं अशीं चित्रें काढलीं कीं, टॉलस्टॉय जर कलावान् असता तर तीं त्यानें काढलीं असतीं. पण केवळ रंग व ब्रश, कॅन्व्हस व कापड, यांवरच युध्दांची क्रूरता व भीषणता दाखविणारीं चित्रें तो काढी असे नव्हे, तर अंगिहारी येथील लढाईचें त्यानें केलेलें वर्णन—त्यानें काढलेलें शब्दचित्र—इतकें उत्कृष्ट आहे कीं, थोर रशियन कादंबरीकारांच्या उत्कृष्ट लिखाणांशींच ते तुलितां येईल. ती तेथली रणधुमाळी, ती धूळ, तो धूर, लढणार्‍यांच्या वेदनाविव्हल तोंडांवर पडलेला सुर्याचा लालसर प्रकाश, जखमी होऊन पडलेल्या शिपायांचे शीर्णविदीर्ण देह, छिन्नविच्छिन झालेले घोडे, प्रत्येक दिशेनें येणारी बाणांची वृष्टि, पाठलाग करीत येणार्‍यांचे पाठीमागें उडणारे केस, रक्तानें माखलेल्या धुळींतून व घसरड्या रस्त्यांतून, पाठीवरच्या स्वारांना वाहून नेताना घोड्यांच्या टापांनीं पडलेले खळगे, फुटकींतुटकीं चिलखतें, मोडलेले भाले, तुटलेल्या तरवारी, फुटलेलीं शिरस्त्राणें, या सार्‍या वस्तू मेलेल्यांच्या व मरणार्‍यांच्या तंगड्यांमध्यें विखुरलेल्या असत; त्या मोठमोठ्या जखमांच्या तोंडांतून भळभळां वाहणारें रक्त, ते टक लावून पाहणारे डोळे, मेलेल्यांच्या त्या घट्ट मिटलेल्या मुठी, त्यांच्या त्या नाना दशा, श्रमलेल्या शिपायांच्या अंगांवरची घाण आणि धूळ, रक्त, घाम व चिखल यांची घाण—या व अशा हजारों बारीकसारीक गोष्टी लिओनार्डोनें लढाईच्या त्या वर्णनांत आणल्या आहेत. त्यानें हें शब्दचित्र कॅन्व्हसवर रंगवून ठेवलें नाहीं ही किती दु:खाची गोष्ट ! तें चित्र किती भीषण व हृदयद्रावक झालें असतें ! त्यानें अंगिहारीच्या लढाईचीं कांहीं स्केचिस केलीं; पण रंगीत चित्र तयार केलें नाहीं. त्याला कदाचित् असेंहि वाटलें असेल कीं, हें काम आपल्याहि प्रतिभेच्या व बुध्दीच्या पलीकडचें आहे. मनुष्याची क्रूरता दाखवावयाला मनुष्याची कला जणूं अपुरी पडते असें वाटतें.

- ४ -

आपण पाहिलें कीं, लिओनार्डो हा अत्यंत स्वयंभू व अभिजात असा कालावान् होता. त्याच्या कृतींत अनुकरण नाहीं. तो म्हणे, ''आपण निसर्गाचें अनुकरण करावें, दुसर्‍या कलावन्ताचें करूं नये.'' ग्रीक हे उत्कृष्ट कलावंत होते. कारण, ते निसर्गानुकारी होते. पण रोमन कलावन्त दुय्यम दर्जाचे वाटतात. कारण, निसर्गाचें अनुकरण करण्याऐवजीं त्यांनीं माणसांचें-ग्रीकांचे-अनुकरण केलें. जुन्या ग्रीक कलावेत्त्यांत जी प्रतिभेची ज्वाला होती ती लिओनार्डोमध्यें होती. लिओनार्डो जीवनांतून स्फूर्ति घेई. कधीं कधीं तर तो जीवनाच्या पलीकडेहि जाई. जीवनांत नसलेलेंहि त्यांत ओतून तो अधिक सौंदर्य निर्भी. मोना लिसाची जी प्रतिकृति त्यानें काढली आहे तींत किती नाजूकपणा, किती कोमलता, किती सुंदरता व एक प्रकारची प्रभुशरणता आहेत ! मूळच्या खर्‍या मोना लिसाच्या चेहर्‍यांत या सार्‍या भावना क्वचितच असतील. हें चित्र काढतांना लिओनार्डोनें निसर्गाचें अनुकरण केलें नसून निसर्गानेंच जणूं लिओनार्डोचें अनुकरण केलें आहे असें वाटतें. त्या मानवी मुखमंडलावर त्यानें इतकी मधुरता रेखाटली आहे आणि इतका चांगुलपणा उमटविला आहे, याचें कारण त्याच्या हृदयांतच अपार साधुता, अपार मधुरता होती. फिडियसच्या कलेचा आत्मा जसा लिओनार्डोजवळ होता, तसें त्याच्याजवळ सेंट फ्रॅन्सिसचें हृदयहि होतें. तो जीवनाकडे दु:खी स्मितानें पाहतो. त्याला मानवांचीं दु:खें पाहून त्यांची करुणा येई; पण त्यांचा मूर्खपणा पाहून तो स्मित करी.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel