वयाची वीस वर्षे होईपर्यंत अशा प्रकारचें शारीरिक व मानसिक शिक्षण या आदर्श राज्यव्यवस्थेंत मुलांना दिलें जाईल.  मुलें वीस वर्षांचीं झालीं म्हणजे एकदां चाळण मारायची, निवड करायची.  पुढें आणखी शिकायला जीं असमर्थ असतील त्यांना शूद्र वर्गांत घालावयाचें, त्यांनीं शारीरिक श्रम उचलायचे, तसेंच वैश्यकर्महि उचलायचें.  शेतकरी, कामकरी व वैश्य हे सारे या वर्गांत.  आदर्श राज्यव्यवस्थेंमधील हे हीन धातू.  यांना काढून टाकल्यावर जे राहतील त्यांचें शिक्षण पुढें चालू करायचें.

पुढें आणखी दहा वर्षे म्हणजे मुलें तीस वर्षांचीं होईपर्यंत त्यांना विज्ञानविद्या शिकवायची.  अंकगणित, भूमिति, ज्योतिर्विद्या, हें विषय शिकवायचे.  हे विषय व्यवहारोपयोगी म्हणून नाहीं शिकवायचे, तर सौंदार्यदृष्टि यावी, प्रमाणबध्दता यावी, म्हणून शिकवायचे.  अंकगणिताचा उपयोग केवळ बाजारांत-देवघेवीसाठीं करणें हें कमीपणाचें आहे, असे प्लेटोच्या आदर्श राज्यामधील प्रतिष्ठित सज्जन मानीत.  गणिताचा उपयोग हिशोबासाठीं किंवा इमारती बांधण्यासाठीं, पूल बांधण्यासाठीं किंवा यंत्रें करण्यासाठीं करणें हें आदर्श राज्यांतील सन्मान्य नागरिक कमी प्रतीचें मानीत.  प्लेटो या बाबतींत समकालीन ग्रीकांशीं सहमत होता.  ग्रीक लोकांना यांत्रिक संशोधनांत किंवा भौतिक सुधारणा करण्यांत गोडी वाटत नसे ; त्यांना ती आवड नव्हती.  तिकडे त्यांची प्रवृत्ति नसे.  मूर्त व प्रत्यक्ष इंद्रियगम्य ज्ञानापेक्षां अमूर्त व अप्रत्यक्ष इंद्रियातील ज्ञानाकडेच ते भरारी मारूं पाहत. अंकगणिताचा अभ्यास प्लेटोच्या मतें फक्त दोन गोष्टींसाठींच करणें बरें.  वस्तूंच्या दृश्य विविधतेंतून शाश्वत एकतेकडे जाण्यासाठीं तत्त्वज्ञान्याला गणिताचें साह्य होतें ; दुसरी गोष्ट म्हणजे लष्करी सेनापतीला त्यायोगें आपले शिपाई नीट रांगांत उभे करतां येतात, त्यांच्या चारचारांच्या रांगा करतां येतात, निरनिराळ्या छोट्यामोठ्या पलटणी करतां येतात, दहांच्या, शंभरांच्या, हजारांच्या अशा टोळ्या करतां येतात.  गणिताचा सखोल अभ्यास फक्त तत्त्वज्ञानी व सेनानी यांनींच करावा.

तीन वर्षांचे वय होईपर्यंत मुलांचा विज्ञानाचा अभ्यास पुरा होईल.  आणि मग पुन्हा चाळण मारायची, पुन्हां निवड.  अधिक उच्च शिक्षण घेण्यास जे असमर्थ ठरतील त्यांना बाजूस काढायचें, त्यांचा मध्यम वर्ग बनवायचा.  शिपायांचा, सैनिकांचा, लढवय्यांचा हा वर्ग.  आदर्श राज्याचे हे पालनकर्ते, रक्षणकर्ते.  प्लेटो जरी परम थोर विचारस्त्रष्टा होता तरी चिनी, हिंदू व ज्यू यांची थोर दृष्टि त्याच्याजवळ नव्हती.  शांतीचें ध्येय ग्रीक मनोबुध्दीच्या कक्षेच्या पलीकडचें होतें.  अति उत्कृष्ट असें ग्रीक मत, अति सुसंस्कृत व परमोन्नत असें ग्रीक मत सुध्दां शांतीचें ध्येय, शांतीचा आदर्श कल्पूं शकत नव्हतें.  प्लेटोच्या आदर्श राज्यांत सैनिकांना महत्त्वाचें कार्य आहे. 'सैनिकांशिवाय राष्ट्र' ही गोष्ट 'गुलामांशिवाय राष्ट्र' याप्रमाणेंच अशक्य वस्तु आहे असें प्लेटोला वाटे.  राज्य म्हटलें म्हणजे तेथें दास हवे तसे सैनिकहि हवे !  प्लेटोच्या भव्य-दिव्य प्रतिभेचें व अपूर्व बुध्दिमत्तेचें कौतुक वाटतें.  आपणांस त्याच्याबद्दल परम आदर वाटतो.  परंतु युध्दावरचा त्याचा विश्वास व गुलामगिरीला त्यानें दिलेली परवानगी या दोन गोष्टींचा कलंक त्याच्या प्रतिभाचंद्रिकेला लागलेला आहे.

आपण दोन वर्ग पाहिले.  शेतकरी, कामकरी व व्यापारी यांचा खालचा वर्ग व नंतर हा क्षत्रियांचा दुसरा मध्यम वर्ग.  विसाव्या वर्षी ज्यांची मनोबुध्दि कमी दर्जाची दिसेल त्यांचा खालचा वर्ग.  तिसाव्या वर्षी मनोबुध्दीचा अधिक विकास करून घ्यायला जे असमर्थ दिसतील त्यांचा मध्यम वर्ग.  या दोन चाळण्यांनंतर जे उरतील त्यांनीं तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावयाचा.  आतां हीं तीसवर्षांचीं वेंचक मुलें आहेत.  आदर्श राज्यकारभार चालवण्यास योग्य अशी ही मंडळी.  प्लेटोच्या आदर्श राज्यांत लैंगिक समानता आहे.  स्त्रीपुरुषांना विकासाची, गुणवर्धनाची, पूर्ण मोकळीक आहे, समानता आहे.  दोघांनाहि समान शिक्षण, समान संधि ; जीवनाचीं महत्त्वाचीं कामें अंगावर घेतांना स्त्रीपुरुषांना कोणतेंहि स्थान आपापल्या योग्यतेनुरूप देण्याची मुभा आहे.  पांच वर्षे तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यावरहि अभ्यासक्रम पुरा झाला असें नाहीं.  चांगला राज्यकारभार चालवायला हीं मुलें अद्याप समर्थ नाहीं झालीं ; अजून कसोटी आहे.  विचाराच्या राज्यांतून प्रत्यक्ष कार्यक्षेत्रांत उतरून त्यांनीं आतां परीक्षा द्यावयाची.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel